बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाला रेल्वे पोलीस व माणूसकीचा आधार, कुटुंबाशी घडवून आणली भेट...

 0
बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाला रेल्वे पोलीस व माणूसकीचा आधार, कुटुंबाशी घडवून आणली भेट...

बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिहारच्या तरुणाला ‘माणुसकी’चा आधार

रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नांना यश; नातेवाईकांचा शोध लागला, पतीला पाहताच पत्नीचे अश्रू अनावर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 10 (डि-24 न्यूज) : रेल्वे स्थानकावर बेवारस अवस्थेत आढळून आलेल्या बिहारमधील एका तरुणाला रेल्वे पोलिसांनी ‘माणुसकी वृद्ध सेवालय’च्या मदतीने आधार दिला. पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तब्बल दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणाच्या नातेवाईकांचा शोध लागला. पतीला सुखरूप पाहताच पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला. पोलिस, माणुसकी समूह आणि वृद्ध सेवालयाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तरुणाची आपल्या कुटुंबीयांशी पुन्हा भेट झाली.

दि. 6 ऑगस्ट रोजी रेल्वे स्थानकावर एक तरुण बेवारस अवस्थेत आढळून आला. आरपीएफचे पोलीस अधिकारी राकेश शर्मा यांनी त्याची विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर त्याला रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस निरीक्षक विरयानी कदम यांनी त्याची सखोल विचारपूस केली असता त्याने आपले नाव व बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील दुमाहाथा, थाना येथील रहिवासी असल्याचे सांगितले.

रेल्वे पोलिसांनी त्याच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी मनोरुग्ण व निराधार व्यक्तींसाठी काम करणाऱ्या सु-लक्षी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित ‘माणुसकी वृद्ध सेवालय’शी संपर्क साधला. सुमित पंडित यांनी पोलिसांच्या मदतीने आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून त्याला प्रथमोपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या तपासणीत तो मानसिक तणावाच्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्याला व्यवस्थित उभे राहता येत नव्हते तसेच बोलण्यातही अडचण येत होती. प्रथमोपचारानंतर त्याला माणुसकी वृद्ध सेवालयात दाखल करण्यात आले.

पत्नीचा मोबाईल क्रमांक सांगितल्याने लागला शोध

माणुसकी समूहाच्या टीमने तरुणाला विश्वासात घेऊन त्याच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्याने पत्नीचा मोबाईल क्रमांक सांगितला. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्याची पत्नी साकीबा साकीब अली यांच्याशी संपर्क झाला. पती दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.

पती छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळताच पत्नीने नातेवाईकांसह शहरात येण्याचे सांगितले. दोन दिवसांनंतर नातेवाईक माणुसकी वृद्ध सेवालयात दाखल झाले. कागदपत्रे व ओळख पटविल्यानंतर संबंधित तरुणाची खात्री झाली. त्यानंतर माणुसकी समूहाच्या टीमने त्याला रेल्वे पोलिसांच्या उपस्थितीत रेल्वे पोलीस ठाण्यात आणले आणि पोलिसांच्या समक्ष नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

‘तुमच्यामुळे माझे पती मला परत मिळाले’

पतीला पाहताच पत्नी साकीबा यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या लग्नाला अवघे आठ महिने झाले आहेत. कुटुंबात सासू, सासरे, नणंद आणि पती असे सदस्य असून पती हे कुटुंबातील एकमेव कमावते आहेत. कामानिमित्त ते सौदी अरेबियात गेले होते. काही कामासाठी मुंबईला आल्यानंतर त्यांनी गावी परत येत असल्याचे सांगितले होते.

मुंबई विमानतळावर असल्याचे सांगून तिकीट बुक करण्यास सांगितले होते. कुटुंबीयांनी तिकीट बुक केले; मात्र ते विमानतळावर पोहोचलेच नाहीत. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. दोन दिवसांनी दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून झाशी रेल्वे स्थानकावरून संपर्क साधत मोबाईल, बॅग आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले होते. कुटुंबीयांनी झाशी रेल्वे स्थानक परिसरात त्यांचा शोध घेतला; मात्र ते सापडले नव्हते.

“तुम्ही माझ्या पतीला सहारा दिला, त्यांची काळजी घेतली आणि त्यांना आम्हाला परत मिळवून दिले. तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही,” अशा भावना पत्नी साकीबा यांनी व्यक्त केल्या.

पोलिसांसह ‘माणुसकी’ समूहाचे कौतुक

बेवारस अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीकडे केवळ कायदेशीर बाब म्हणून न पाहता त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याचे काम रेल्वे पोलिसांनी केले. या संपूर्ण कार्यात माणुसकी वृद्ध सेवालयानेही महत्त्वाची भूमिका बजावली.

“एखाद्या अधिकाऱ्याकडे तपास नसला, तरी त्याने लक्ष देऊन काम केले तर काम पूर्णत्वास जाऊ शकते. या प्रकरणात पोलिस निरीक्षक विरयानी कदम यांनी सातत्याने प्रयत्न करून बिहार पोलिसांशी संपर्क साधला आणि अखेर तरुणाच्या पत्नीचा संपर्क मिळवला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली,” असे सांगण्यात आले.

माणुसकी समूहाचे सुमित पंडित हे पोलिसांना बेवारस अवस्थेत आढळणारे मनोरुग्ण, वृद्ध आणि निराधार व्यक्तींना मदत करण्यासाठी अनेकदा रात्री-अपरात्रीही धावून जातात. आतापर्यंत सुमारे 52 व्यक्तींच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विरयानी कदम यांनी दिली.

या कार्यासाठी पोलीस अधीक्षक, लोहमार्ग संभाजीनगर संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी इशामोद्दीन पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विरयानी कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती फड, पोलीस उपनिरीक्षक अनिता बागुल, सहाय्यक फौजदार चंद्रविजय प्रधान, संजय राऊत, सतीश घोडके, दिगंबर राठोड, आरपीएफचे अधिकारी राकेश शर्मा तसेच माणुसकी समूहाचे सुमित पंडित, प्रा. शरद सोनवणे, विजय निंबाळकर आणि माणुसकी वृद्ध आश्रमाच्या संचालिका पूजा पंडित यांनी सहकार्य केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow