अल-खैर-बैतूल माल पतसंस्थेत बिनव्याजी कर्ज, 24 वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
अल-खैर पतसंस्थेच्या माध्यमातून लघुउद्योजक, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना - इंजि. अब्दुल वाजेद कादरी
24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 20(प्रतिनिधी)-
अल-खैर बैतुलमाल अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., छत्रपती संभाजीनगरची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मरकज-ए-इस्लामी, युनूस कॉलनी येथे संस्थेचे अध्यक्ष इंजि.अब्दुल वाजिद कादरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
यावेळी अध्यक्ष अब्दुल वाजिद कादरी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, अल-खैर ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून सभासदांच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारी आणि समाजाच्या आर्थिक विकासात योगदान देणारी सहकारी संस्था म्हणून कार्य करीत आहे. देशाच्या विकासात आणि सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) वाढीत आपला वाटा उचलण्यासाठी लघुउद्योजक, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणारे तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर संस्थेचा विशेष भर असल्याचे त्यांनी सांगितले.
लघुउद्योजक आणि छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेमार्फत विविध कर्ज बिनव्याजी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच महिला बचत गटांनाही आर्थिक सहकार्य करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यात येत आहे.
सभेत बोलताना अध्यक्षांनी सोने तारण कर्ज सुविधेचीही माहिती दिली. सभासदांच्या तातडीच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन सोने तारणाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या या सुविधेवर दरवर्षी केवळ 1 टक्के सेवा शुल्क आकारले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
वार्षिक अहवालातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा
संस्थेचे सचिव श्री. नासेर जोहरी यांनी यावेळी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. पतसंस्थेच्या ठेवी, नफा, खर्ज याबद्दल सविस्तर माहिती दिली. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेने केलेली प्रगती, विविध आर्थिक उपक्रम, सभासदांना देण्यात आलेल्या सुविधा तसेच संस्थेच्या आर्थिक कामगिरीची माहिती त्यांनी आकडेवारी व वस्तुनिष्ठ तथ्यांच्या आधारे सभेसमोर मांडली.
त्यांच्या सादरीकरणातून संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाची दिशा आणि झालेली प्रगती सभासदांसमोर स्पष्ट झाली.
ठरावांना मंजुरी आणि संस्थेच्या डिजिटल वाटचालीची घोषणा
यावेळी श्री. जव्वाद कादरी यांनी विविध ठराव सभेसमोर मांडले. सभेने आवश्यक त्या ठरावांना मंजुरी दिली.
तसेच अल-खैरच्या डिजिटल वाटचालीतील महत्त्वाचे पाऊल म्हणून मोबाईल ॲपच्या माध्यमातून संस्थेच्या सेवा डिजिटल करण्याची घोषणा करण्यात आली. भविष्यात सभासदांना डिजिटल माध्यमातून आपल्या खात्याची माहिती व विविध सेवांचा अधिक सुलभपणे लाभ घेता येणार असून, संस्थेच्या कामकाजात डिजिटल अकाउंट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार आहे.
अध्यक्षांनी सांगितले की, बदलत्या काळानुसार सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक असून, पारदर्शकता, सुलभ सेवा आणि सभासदांच्या सोयीसाठी अल-खैर डिजिटल प्रणालीकडे ठोस पावले टाकत आहे.
पुढील वाटचालीसाठी सामूहिक सहकार्याचे आवाहन
संस्थेच्या भविष्यातील विकासासाठी सभासदांनी अधिकाधिक बचत करावी, संस्थेशी सक्रियपणे जोडले जावे आणि संस्थेच्या विकासात आपला सहभाग वाढवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. लघुउद्योग, छोटे व्यवसाय, महिला बचत गट आणि स्वयंरोजगाराला आर्थिक पाठबळ देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा संस्थेचा प्रयत्न पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक हाफीज हबीबुल्लाह तसेच अल-खैरच्या सर्व कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले.
यावेळी सी.ए. अन्वर हुसेन यांच्यासह शहरातील नागरिक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे संचालक कादीर खान, नासिर पाशु आणि श्रीमती फईमुनिसा यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी सर्व सभासद, संचालक मंडळ आणि कर्मचारी यांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
संचालक मंडळाने शेवटी सभासदांच्या अडचणी समजून घेतल्या व सोडविण्या
चे आश्वासन दिले.
What's Your Reaction?