हाॅटेल अमरप्रीतवर एफडीएच्या कारवाईने खळबळ, परवाना निलंबित

 0
हाॅटेल अमरप्रीतवर एफडीएच्या कारवाईने खळबळ, परवाना निलंबित

हॉटेल अमरप्रीला एफडीएचा दणका; अन्न परवाना तात्काळ निलंबित...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), दि.12(डि-24 न्यूज)-‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाने जालना रोडवरील प्रसिद्ध मे. हॉटेल अमरप्रीत (अवतार मोटेल्स आणि सिने प्रा. लि.) येथे धडक तपासणी केली. या तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि अन्न साठवणुकीसंदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याने हॉटेलचा FSSAI अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.

तपासणीदरम्यान चिलिंग सेंटर व स्टोअर रूममध्ये सडलेल्या आणि मुदतबाह्य भाज्या, त्यामध्ये काकडी, ढोबळी मिरची, फुलकोबी व पत्ताकोबी आढळून आल्या. तसेच खराब व मुदतबाह्य मशरूम आणि पिझ्झा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मुदतबाह्य पिझ्झा बेस साठवून ठेवल्याचेही निदर्शनास आले.

हॉटेलमध्ये विना लेबल असलेल्या मार्गारीनचा साठा आढळून आला. मेनू कार्डवर ‘बटर’ असा उल्लेख असताना बटर चिकन, बटर तंदुरी रोटी आणि ग्रेव्हीमध्ये बटरऐवजी मार्गारीनचा वापर केला जात असल्याचा संशय तपासणीदरम्यान व्यक्त करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

याशिवाय हॉटेलच्या स्वयंपाकघरात सांडपाणी साचलेले आढळले, तर कचराकुंड्या उघड्या स्थितीत होत्या. अन्नपदार्थांची साठवणूक करताना ‘फर्स्ट इन, फर्स्ट आउट’ (FIFO) प्रणालीचा वापर केला जात नसल्याचेही आढळून आले.

या गंभीर त्रुटी आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन लक्षात घेऊन हॉटेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. निलंबनाच्या कालावधीत हॉटेलला कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ तयार करणे, प्रक्रिया करणे, साठवणे, विक्री करणे किंवा ग्राहकांना अन्नसेवा देणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

डॉमिनोजच्या चार शाखांवरही कारवाई

दरम्यान, राज्यभरात सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेत स्वच्छता व अन्न साठवणुकीच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने डॉमिनोज पिझ्झाच्या चार शाखांचे अन्न व्यवसाय परवानेही निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. यापैकी तीन शाखा मुंबईतील असून एक शाखा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूर येथील असल्याचे समोर आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अन्नभेसळ आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू असल्याने हॉटेल व खाद्य व्यवसायिकांमध्ये खळबळ उडा

ली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow