आरएसएसच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत आंबेडकरवादीच करु शकतात - सुजात आंबेडकर

 0
आरएसएसच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत आंबेडकरवादीच करु शकतात - सुजात आंबेडकर

वंचितचा आरएसएसच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा 

पोलिसांचा मनाई आदेश असताना वंचितने काढला मोर्चा, आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)-: देशाचे संविधान, राष्ट्रध्वज तिरंगा न माणणाऱ्या आणि भारतीय कायद्यानुसार कोणतीही नोंदणी नसणाऱ्या राष्ट्रीय स्वसंयसेवक संघावर बंदी घालवी, आंबेडकरी कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतीचौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भाग्यनगर, बाबा पेट्रोल पंप परिसरातील आरएसएसच्या कार्यालयावर भव्य जनआक्रोश महामोर्चाने शहराचे लक्ष वेधले. पोलिसांचा मनाई आदेश असताना युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाल्याने पोलिसांचा फोजफाटा आणि बॅरिकेटींग लावून त्याला मध्येच रोखण्यात आले. सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचितच्या शिष्टमंडळाने कार्यालयाजवळ जाऊन राष्ट्रध्वज तिरंगा, संविधान आणि महाराष्ट् संस्था नोंदणी कायद्याची प्रत देण्याचा प्रयत्न केला. परंतु आरएसएसच्या वतीने स्विकारण्यास कोणीही न आल्याने पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.

शहरातील शासकीय अभियांत्रिकी व शासकीय पाॅलिटेक्निक महाविद्यालय परिसरात आरएसएसच्या सदस्य नोंदणीला विरोध केल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे परत घ्यावेत, आरएसएसवर बंदी घालावी यासाठी या मागणीसाठी आरएसएसच्या कार्यालयावरच मोर्चा काढण्याची घोषणा वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणार यावर वंचित ठाम असल्याने शुक्रवारी क्रांतीचौकात आणि आरएसएसच्या कार्यालयाभोवती प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रस्त्यामध्ये जागोजागी बॅरिकेटींग करण्यात आली होती. पोलिसांच्या प्रचंड फोजफाट्यानंतरही वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर, फारुख अहेमद, सिद्धार्थ मोकळे, अमीत भुईगळ, तय्यब जफर, समीभा पाटील, सतीष गायकवाड, माजी नगरसेवक जावेद कुरेशी, अफसर खान, पंकज बनसोडे, मतीन पटेल यांच्यासह राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, इतर आंबेडकरी संघटनांचे नेते, समविचारी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. आरएसएस मुद्दार्बाद, संविधान जिंदाबाच्या...घोषणांनी परिसर दणाणून गेला. सिद्धार्थ मोकळे यांनी या मोर्चाची प्रस्तावना केली तर क्रांतीचौक येथील व्यासपीठावर काही नेत्यांची भाषणे झाली. सुजात आंबेडकर यांनी आरएसएसच्या विरोधात चांगलाच हल्ला चढविला. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी शांततेत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे घोषित केले. मोर्चा काढून भारतीय राष्ट्ध्वज तिरंगा, भारतीय राज्य घटना आणि महाराष्ट् नोंदणी कायद्याची प्रत आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना भेट देणार असल्याचे सांगितले. उपस्थितांच्या भाषणानंतर क्रांतीचौकातून मोर्चाला शांततेत सुरुवात झाली. जन आक्रोश मोर्चा क्रांतीचौकातून विरुद्ध दिशेने बाबा पेट्रोल पंपाकडे सरकला यामध्ये असंख्य महीलांनीही हातात झेंडे घेऊन सहभाग घेतला. शासकीय कर्मचारी निवासस्थानाच्या बाजुला रस्त्यावर बॅरिकेटींग लावून रस्ता आडविण्यात आला होता. बॅरिकेटींगच्या पुढे शीग्रकृती दलाचे जवान उभे होते. मोर्चेकरी बॅरिकेटींगपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी थोडी लोटालोटी केली. परंतु नेत्यांच्या सूचनेनंतर कार्यकर्ते शांत झाले. त्यानंतर वंचितचे शिष्टमंडळ पोलिसांच्या वाहनातून आरएसएसच्या कार्यालयाकडे नेण्यात आले. परंतु त्या ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्या. विवेकानंद कॉलेजच्या बाजुला रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. त्या ठिकाणी शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना निरोप पाठविला. परंतु त्यांच्याकडून कोणीही आले नाही. शिष्टमंडळाने कार्यालयाकडे जावून आणलेली भेट आमच्याकडेच सोपवावी, अशीही विनंती करण्यात आली. पोलिसांच्या विनंतीला मान देत शिष्टमंडळाने सोबत आणलेला राष्ट्रध्वज तिरंगा, संविधान आणि नोंदणी कायदाची प्रत पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडे सुपूर्द केले आणि शिष्टमंडळ पुन्हा आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले.

सैन्याकडील शस्त्र आरएसएसकडे आले कोठून... ?

मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना सुजात आंबेडकर यांनी आरएसएसवर प्रचंड हल्लाबोल केला. शैक्षणिक संस्थांमध्ये कोणतेही धार्मिक कृत्य करण्यास बंदी असताना सदस्य नोंदणी सुरू होती. याला विरोध करणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांवर अजामीनपात्र असे गुन्हे दाखल करण्यात आले. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ज्या संघटनेची स्वत:ची नोंदणी नाही, अशी संघटना इतरांना सदस्य नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याची टिका सुजात आंबेडकर यांनी आरएसएसवर केली. आरएसएसने आपली नोंदणी दाखवावी, असे आव्हान दिले. दसऱ्याच्या दिवशी आरएसएसकडून शस्त्रांचे पूजन केले जाते. ते शस्त्र केवळ सैन्याकडेच असते. तर ते आरएसएसकडे आले कोठून, त्यांना असे शस्त्र बाळगण्याचा परवाना कुणी दिला, असा प्रश्नही केला. शस्त्र बाळगण्याचा परवाना नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सुजात आंबेडकर यांनी केली. आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करणारे देशद्रोही अशी टिका करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांना सुजात आंबेडकर यांनी प्रत्यूत्तर दिले ते म्हणाले रजिस्ट्रेशन नसताना देणगी जमा करणे, आरएसएस जे फंड गोळा करते ते कोणत्या कायद्यानुसार जमा करते. त्याचा आयकर भरणा केला जातो का असा प्रश्नही उपस्थित केला. विनापरवानगी शस्त्र बाळगण्याचा अधिकार कोणी दिला. अशी टिका त्यांनी केली.

शहरात पहील्यांदाच ऐतेहासिक आंदोलन...

राज्यात आणि देशात भाजपची सत्ता आहे. सत्तेच्या जोरावर त्यांनी अनेक विरोधकांना कायद्यामध्ये अडकविले आहे. अनेकांचा मनुवादाला विरोध आहे. परंतु कारवाईच्या भीतीने उघड भूमिका घेत नाहीत. परंतु आरएसएस सारख्या मनुवादी विचारांचा मुकाबला केवळ आंबेडकरवादीच करू शकतात. काँग्रेस, राष्ट्रवादी व विरोधीपक्षात हिंमत नाही आरएसएसच्या विरोधात मोर्चा काढण्याची. आंबेडकरवादीच हि हिमत करु शकते. त्यामुळे त्यांनी थेट कार्यालयावरच मोर्चा काढण्याची घोषणा केली आणि ती खरीही करून दाखविली. ही देशातील ऐतेहासिक घटना असून यामुळे आरएसएसच्या विरोधातील आंदोलनाला मोठे बळ मिळेल हा लढा सुरूच राहणार आहे. कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले नाही तर न्यायालयीन व रस्त्यावरील लढाई लढणार असाही इशारा सुजात आंबेडकर यांनी यावेळी दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य नोंदणीला विरोध करणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे आरएसएस विरुद्धचा संताप उफाळून आला. वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चात त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. मोर्चात संविधानावर विश्वास असणाऱ्या आणि लोकशाही मूल्य माणणाऱ्या अनेक पक्ष संघटनांचे नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे सुजात आंबेडकरांनी आरएसएसविरुद्ध सुरु केलेला हा एल्गार देशभर पसरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनुवादी विचाराच्या विरोधात आणि पोलिसांच्या दडपशाहीच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा वंचितने केली होती. या मोर्चात संविधानवादी पक्ष संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही केले होते. या मोर्चात तिरंगा झेंडा, संविधान हातात घेऊन या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक संघटनांनी बँनर, पोस्टर घेऊन या मोर्चात सहभागी नोंदविला. यामध्ये भाकप, माकप, एसडिपिआई, ओबीसी, आदिवासी, मुस्लीम संघटनांचा सहभाग होता. तर संभाजी बिग्रेडने पत्रक काढून पाठिंबा दिला होता. विविध पक्षातील आंबेडकरवादी कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मनुवादी विचाराच्या विरोधातील ही एकजूट भविष्यातील राजकारणावर आणि निवडणुकांवर नक्कीच प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. 

या मोर्चात वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, अरुंधतीताई शिरसाट, राज्य कार्यकारिणी सदस्य अमीत भुईगळ, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, फारुख अहमद, अफसर खान, जावेद कुरेशी, नागोराव पांचाळ, शमीभा पाटील, सविताताई मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष योगेश बन, प्रवक्ते तय्यब जफर, जितरत्न पटाईत, मतीन पटेल, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, युवा आघाडीचे अमोल लांडगे, डॉ. अरुण जाधव, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, पूर्व रामेश्वर तायडे, पश्चीम जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, पंकज बनसोडे, संदीप जाधव, मेघानंद जाधव, सतीष शिंदे, भावी गवई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

संविधान, राष्ट्ध्वजाचा अपमान केला.

सुजात आंबेडकर यांनी भारताचा तिरंगा ध्वज दिला, अमित भुईगळ यांनी भारताचे संविधान दिले, शमीभा पाटील यांनी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत दिली पोलीस उपायुक्त यांनी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाकडून हे सर्व स्वीकारले. आंबेडकरी जनता ही संविधानवादी आहे. त्यामुळे या देशाचा कारभार ज्या संविधानावर चालतो ते संविधान, राष्ट्रध्वज आणि महाराष्ट्र नोंदणी कायद्याची प्रत आम्ही भेट देण्यास गेलो. परंतु ही भेट त्यांनी स्वीकारली नाही. त्यामुळे त्यांनी संविधानाचा आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला. 

आपली नोंदणी दाखवा

देशात कोणतीही संघटना चालवायची असेल तर त्याला आपली नोंदणी करावी लागते. असे असतानाही देशात आरएसएस मागील शंभर वर्षांपासून कार्यरत असताना त्यांनी आपली नोंदणी केलेली नाही. त्यामुळे आरएसएसच्या कोणत्याही कृती बेकायदेशीर आहेत. त्यामुळे त्यांनी एकतर नोंदणी करावी, अन्यथा त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी प्रवक्ते तय्यब जफर यांनी केली. आरएसएसला देशाचे संविधान मानावेच लागेल, असेही त्यांनी सांगितले. 

फिर्यादी पोलीस कसे... ?

आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आरएसएसच्या बेकायदेशीर नोंदणीला विरोध केला. त्यामुळे याबाबत आरएसएसच्या लोकांनी तक्रार देणे गरजेचे होते. ते समोर आले नाही. पोलिसांना पुढे करून तक्रार नोंदविली. यांच्यात तक्रार देण्याचीही हिंमत नसल्याचा आरोप अरुण जाधव यांनी केला. 

खरे देशद्रोही तेच

आरएसएस सारखी संघटना दररोज अनेकांना देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत फिरत असते. त्यांचा स्वातंत्र्यलढ्यात कोणताही सहभाग नव्हता. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस न पाळता काळता दिवस पाळतात. अनेकवर्षे त्यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकविण्यात येत नव्हता. अनेक घातक कारवायांमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे खरे देशद्रोही तेच आहेत, असा आरोप अमीत भुईगळ यांनी केला. आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढू नये यासाठी मोठा दबाव आणला. परंतु आंबेडकरी जनता कोणाच्याही बापाला घाबरत नसल्याचे या मोर्चाने दाखवून दिले, असेही ते म्हणाले. 

तर रेशीमबागवरही मोर्चा काढू

मोर्चाची घोषणा केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा, अशी विनंती केली होती. परंतु आरएसएसच्या दबावाखाली पोलिसांनी आंबेडकरी कार्याकर्त्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले. पोलीस यंत्रणा जर आरएसएसच्या आदेशावर आणि आरएसएसकडून संचलित होत असेल तर मोर्चाही आरएसएसच्याच कार्यालयावर काढण्यात येईल, असे ठाम सांगितले. यानंतरही खोटे गुन्हे मागे न घेतल्यास नागपूरच्या रेशीमबागेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रवक्ते फारुख अहेमद यांनी दिला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow