महापालिका निवडणुकीत गडबडीचा आरोप, ईव्हीएम जतन करून ठेवण्याचे खंडपीठाचे अंतरिम आदेश...
"निवडणूक याचिकेच्या प्रलंबित काळात ईव्हीएम जतन करून ठेवण्याच्या खंडपीठाचा अंतरिम आदेश"...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमधील वार्ड क्रमांक 16 मधील अ आणि ब प्रभाग मधील विजयी उमेदवार यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सदरील निवडणुकीतील ईव्हीएम, सीसीटीव्ही फुटेज जतन करून ठेवण्याचे अंतरिम आदेश निवडणूक आयोग आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहेत.
दिनांक 15 जानेवारी 2026 झालेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 अ आणि ब मधून अनुक्रमे संगीता नितीन सांगळे आणि राजू जगन्नाथ वाडेकर हे विजयी झाले होते. सदरील निकाल लागल्यानंतर संबंधित प्रभाग क्रमांक 16 अ आणि ब मधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार एडवोकेट अभय टाकसाळ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे जहुराबी नासेर खान यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 16 अन्वये निवडणूक याचिका, माननीय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर (महानगरपालिका कोर्ट) औरंगाबाद येथे दाखल केली व त्यामध्ये असे नमूद केले की सदरील निवडणुकीच्या मतमोजणीच्या दरम्यान असे दिसून आले की ईव्हीएम वर निवडणुकीची दिनांक 14 जानेवारी 2026 अशी होती वस्तूतः सदरील निवडणूक ही 15 जानेवारी 2026 ला झालेली आहे त्याचप्रमाणे उमेदवारांचे निवडणूक चिन्ह हे स्पष्ट दिसत नव्हते तसेच ते बटन दबत नव्हते परंतु इतर उमेदवारांचे निवडणूक चिन्ह हे स्पष्टपणे दिसत होते. बुथ क्रमांक 32 वरती हा प्रकार आढळून आल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार एडवोकेट अभय टाकसाळ यांनी त्वरित निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिनांक 15 जानेवारी 2026 ला तक्रार दिली होती तसेच मतमोजणीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी अर्जाद्वारे कळविले की मतमोजणीत ईव्हीएम मशीन वर प्रभाग क्रमांक 16 मध्ये मतदान दिनांक 14 जानेवारी 2026 अशी दिसून आली त्यामुळे ईव्हीएम सोबत छेडछाड झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सदरील निवडणुकीच्या प्रक्रियेत ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याच्या अनुषंगाने सदरील निवडणूक रद्द करण्यासाठी निवडणूक याचिकेद्वारे संबंधित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार एडवोकेट अभय टाकसाळ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उमेदवार जोहराबी नासेर खान यांनी निवडणूक याचिका क्रमांक 14/2026 आणि 15/2026 स्वतंत्रपणे दाखल केल्या व सदरील निवडणुक रद्द करून फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली.
दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या स्वतंत्र निवडणूक याचिकेत सदरील निवडणूक याचिका प्रलंबित असेपर्यंत प्रस्तुत निवडणुकीतील ईव्हीएम, सीसीटीव्ही फुटेज,व्हिडिओ शूटिंग हे सर्व रेकॉर्ड न्यायालयाच्या ताब्यात देण्याचे निवडणूक आयोग तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांना अंतरीम आदेश देण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला, सदरील अर्ज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी फेटाळण्यात आला.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीनंतर 45 दिवसानंतर ईव्हीएम संदर्भातील रेकॉर्ड हा काढून टाकण्यात येतो त्यामुळे सदरील याचिकाकर्त्यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तातडीने सुट्टीच्या दिवशी दिनांक 2 मार्च 2026 ला ऍडव्होकेट रवींद्र व्ही गोरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. सदरील याचिकेवर तातडीची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्यान औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्यासमोर झाली. एडवोकेट रवींद्र गोरे यांनी असा युक्तिवाद केला की, प्रकरणातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ईव्हीएम मशीन वर 14 जानेवारी 2026 ची तारीख चुकून आल्याचे मान्य केलेले आहे ,सदरील सदरील प्रकरणात ईव्हीएम संदर्भात छेडछाड झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आणि म्हणून निवडणूक याचिका साक्षी पुराव्यासाठी सदरील ईव्हीएम जतन करणे आवश्यक आहे.
उपरोक्त सुनावणी नंतर माननीय न्यायालयाने प्रतिवादी निवडणूक आयोग व विजयी उमेदवार तसेच इतर उमेदवार यांना नोटीस काढण्याचा आदेश पारित करताना पुढील तारखेपर्यंत निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सदरील प्रकरणातील ईव्हीएम,सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ शूटिंग रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले आहे.
सदरील प्रकरणात याचिका करता वतीने एडवोकेट रवींद्र गोरे यांनी काम पाहिले त्यांना एडवोकेट गौतम पहिलवान आणि एडवोकेट शुभम शिंदे यांनी सहकार्य केले.
What's Your Reaction?