जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना 183.52 कोटींची कर्जमाफी, 38,531 सभासदांना दिलासा...

 0
जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना 183.52 कोटींची कर्जमाफी, 38,531 सभासदांना दिलासा...

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना 183.52 कोटींची कर्जमाफी; 38 हजार 531 सभासदांना दिलासा!

700 कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट; खरीप हंगामात 30 टक्के वाढीव कर्ज देण्याचा निर्णय

अध्यक्ष आ. विलास भुमरे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत माहिती

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 28 (डि-24 न्यूज) – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. बँकेच्या धोरणानुसार तब्बल 38 हजार 531 सभासदांना एकूण 183 कोटी 52 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. यासोबतच आगामी रब्बी आणि खरीप हंगामासाठी एकूण 700 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार विलास बापू भुमरे यांनी शनिवारी (दि. 28) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

अध्यक्ष आ. विलास बापू भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मासिक बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी हिताचे विविध निर्णय घेण्यात आले. बैठकीस उपाध्यक्ष रामराव शेळके, आमदार रमेश बोरणारे, आमदार अनुराधा चव्हाण, संचालक अर्जुन गाढे, दिनेश परदेशी, रवींद्र काळे, समीर सत्तार, अर्जुन पाटील, संदीप निकम, शेषराव जाधव, सुवर्णा जाधव, मुक्ता तांगडे, जिल्हा निबंधक समृत जाधव आणि कार्यकारी संचालक अजय मोटे यांची उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्ष आ. विलास भुमरे म्हणाले की, जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची स्वतःची बँक असून संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी संस्था आहे. केवळ पीककर्ज वाटप करणे एवढाच बँकेचा उद्देश नसून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. बँकेची प्रतिमा उंचावण्यासोबतच सभासदांमध्ये बँकेबद्दल आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी आगामी काळात विशेष प्रयत्न केले जातील.

यंदा नियमित कर्जवाटपाच्या तुलनेत खरीप हंगामात 30 टक्के वाढीव कर्ज देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार रब्बी हंगामासाठी 290 कोटी रुपये, तर खरीप हंगामासाठी 490 कोटी रुपये असे एकूण 700 कोटी रुपयांचे कर्ज सभासदांना वितरित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

38 हजार 531 सभासदांना करण्यात आलेल्या 183 कोटी 52 लाख रुपयांच्या कर्जमाफीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नव्याने उभारी मिळेल आणि जिल्ह्यातील शेती व शेतकरी अधिक समृद्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही अध्यक्ष भुमरे यांनी व्यक्त केला.

आगामी काळात बँकेच्या माध्यमातून सभासदांसाठी लोकाभिमुख विविध योजना राबविण्यात येणार असून, या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही अध्यक्ष आ. विलास भुमरे यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow