उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्मिती करुन मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करुया - दिलिप गावडे

उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्मिती करून मराठवाडा सजलाम सुफलाम करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया -
विभागीय आयुक्त दिलीप गावडे
गुंतवणूकदार, उद्योजक, यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने संवाद
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.8 (डि-24 न्यूज) :- उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आपल्या सोबत आहे, रस्ते, वाहतूक, पार्किंग प्रश्न, पाणी, वीज, उद्योग सुरक्षा सोडविण्यासह आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्मिती करून मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज केले.
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) विभागातील गुंतवणूकदार, उद्योजक, शासनाच्या विविध प्रकल्पांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) विभागातील आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच उद्योग विभागाशी संबंधित असलेल्या विभागाचे विभाग प्रमुख, उद्योजक तसेच उद्योजक प्रतिनिधी यांची बैठक ऑरिक सीटी शेंद्रा येथे विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, छत्रपती संभाजीनगरचे(औरंगाबाद) पोलीस आयुक्त प्रविण पवार, विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक उपस्थित होते.
बैठकीत संवाद साधताना श्री. गावडे म्हणाले, उद्योजक, गुंतवणूकदार यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर बैठका घेण्यात याव्यात तसेच गुंतवणूकदार उद्योजकांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण तसेच कायदा व सुव्यवस्था या बाबींची प्रभावीपणे हाताळणी करा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
राज्यस्तर व केंद्रीय स्तरावरील विषय निवेदनाद्वारे राज्यस्तरीय समितीला देऊन आवश्यक ते बदल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. उद्योजक संघटनांशी चर्चा करुन त्यांना येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण संबंधित विभागाकडून तत्परतेने करण्यात येईल, असा विश्वास देत विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी गुंतवणूकदारांच्या अडचणी समजून घेत अडचणी सोडविण्यासाठी संबंधित विभागाला सूचना दिल्या.
प्रारंभी जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित असलेल्या लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जालन्याच्या प्रभारी जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार तसेच पोलीस उपअधीक्षक पुजा नानगरे यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
धाराशिवचे(उस्मानाबाद) पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रशासनाची भूमिका विशद केली. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी उद्योजकांनी आणि प्रशासनाने करावयाच्या आठ सूत्री कार्यक्रमाबाबत माहिती दिली. तसेच या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर सर्वच अधिकाऱ्यांनी उद्योजकांना सर्वोतोपरी मदत करण्याबाबत आवाहन केले. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), जालना, लातूर, धाराशिव(उस्मानाबाद), हिंगोली आणि नांदेड जिल्हाधिकारी यांनीही चर्चेत सहभाग घेऊन प्रशासनाची भूमिका विशद केली.
प्रकल्पातील सामानाची चोरी, रस्ता अडविणे, बेकायदेशीर बाबींची मागणी करणे इत्यादी बाबत तात्काळ तक्रार करावी. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे सोपे होते. उशिराने तक्रार केल्यास गुन्हेगारास पकडण्यास विलंब होतो, उद्योजकांनी त्यांच्या औद्योगिक परिसरात सुरक्षा कुंपन करणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे, खाजगी पेट्रोलिंगची व्यवस्था याबाबत उद्योजकांशी चर्चा केली. औद्योगिक क्षेत्राचे सुरक्षा ऑडिट करणार असे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी सांगितले.
उद्योकांना आवश्यक असलेल्या चांगल्या वातावरणासाठी पोलीस विभागाचे पोलीस विभागाचे सर्वोतोपरी प्रयत्न राहील असे पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी सांगितले.
वाळुज इंडस्ट्रिज असोसिएशन, मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री, मसिआ, सिमिया, सीआयआय, डब्लुआयए, लघुउद्योग भारती, देवगिरी इलेक्ट्रानिक क्लस्टर, मराठवाडा ऑटो क्लस्टर, मॅजिक, तसेच आठही जिल्ह्यातील विविध असोसिएशनचे पदाधिकारी तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.
प्रास्ताविक अपर आयुक्त के.आर.परदेशी यांनी केले. आजच्या उद्योजक बैठकीचा उद्देश त्यांनी सांगितला. आभार परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मानले.
What's Your Reaction?






