छत्रपती संभाजीनगर विमानतळावरुन पवित्र हज यात्रेसाठी विमानसेवा सुरू होणार...?

 0
छत्रपती संभाजीनगर विमानतळावरुन पवित्र हज यात्रेसाठी विमानसेवा सुरू होणार...?

छत्रपती संभाजीनगर हज एम्बार्केशन पॉईंट पुन्हा सुरू करण्यासाठी गडकरींची केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांकडे शिफारस

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 28 (डि-24 न्यूज): छत्रपती संभाजीनगर येथील हज एम्बार्केशन पॉईंट पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पाठिंबा दर्शविला आहे. भाजप प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे प्रवक्ते (नागपूर) अन्सार अली यांनी याबाबत केलेल्या निवेदनाची दखल घेत गडकरी यांनी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांना शिफारसपत्र पाठवून या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

अन्सार अली यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, सन 2005 पासून छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हज यात्रेसाठी थेट सौदी अरेबियाला विमानसेवा उपलब्ध होती. त्यामुळे मराठवाड्यासह नाशिक विभागातील हजारो हज यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळत होता. मात्र, 2023 पासून हज कमिटी ऑफ इंडियाने छत्रपती संभाजीनगर हज एम्बार्केशन पॉईंट बंद केल्यामुळे यात्रेकरूंना मुंबईहून प्रवास करावा लागत असून त्यांचा वेळ, पैसा आणि शारीरिक श्रम वाढले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग यात्रेकरूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, हज एम्बार्केशन पॉईंट सुरू असताना मराठवाड्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली होती. तसेच व्यापार, पर्यटन, उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार क्षेत्रालाही चालना मिळाली होती. राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे अत्याधुनिक हज हाऊस उभारले असून त्याचा प्रभावी वापर होण्यासाठी हज एम्बार्केशन पॉईंट पुन्हा सुरू करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांना पत्र पाठवून छत्रपती संभाजीनगर येथे हज एम्बार्केशन पॉईंट पुन्हा सुरू करण्याच्या मागणीची पडताळणी करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. मराठवाड्यातील हज यात्रेकरूंच्या सोयीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

हज यात्रा 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असल्याने यासंदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, छत्रपती संभाजीनगर हज एम्बार्केशन पॉईंट पुन्हा सुरू झाल्यास मराठवाड्यातील हजारो हज यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow