गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डिजे मालक-चालक-ऑपरेटरांची बैठक संपन्न...!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे चालक-मालक-ऑपरेटर यांची बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)-आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत व शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करून पार पडावा, यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आज पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात शहरातील डीजे चालक, मालक व ऑपरेटर असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीस शहर व शहरालगतच्या परिसरातील एकूण 115 डीजे चालक-मालक असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
बैठकीमध्ये गणेशोत्सवाच्या काळात डीजे व ध्वनिक्षेपकांचा वापर करताना ध्वनीप्रदूषणाची निर्धारित मर्यादा, ध्वनीची तीव्रता, ध्वनिक्षेपणाची वेळ तसेच संबंधित कायदेशीर तरतुदी व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच शहरातील डीजे चालक-मालक असोसिएशनने एका डीजे सेटअपमध्ये जास्तीत जास्त 2 टॉप व 2 बेस वापरण्याचे तसेच कोणतेही प्रेशर मिड साउंड स्पीकर व प्लाझ्मा स्पीकर वापरणार नसल्याचे आश्वासन पोलीस प्रशासनास दिले.
बैठकीनंतर शहरातील डीजे चालकांकडून पोलीस परेड ग्राउंड येथे त्यांच्या साउंड सिस्टीमचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
या प्रात्यक्षिकादरम्यान प्रशिक्षित पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने नॉईज लेव्हल मीटरच्या सहाय्याने ध्वनीची तीव्रता व त्याचे रीडिंग प्रत्यक्ष घेतले. यावेळी उपस्थित डीजे चालक व मालकांना ध्वनीप्रदूषणाची निर्धारित मर्यादा, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर व सार्वजनिक शांततेवर होणारा परिणाम तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास उद्भवणाऱ्या कायदेशीर बाबी याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जाणीव व गांभीर्य करून देण्यात आले.
सदर बैठक पोलीस आयुक्त, प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव व पोलीस उपायुक्त (परिमंडळ-2) रत्नाकर नवले यांच्या उपस्थितीत पार पडली.
पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व डीजे चालक, मालक व ऑपरेटर यांनी ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करून, नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेत गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?