महात्मा ज्योतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करावे - विभागीय आयुक्त जी.श्रीकांत

 0
महात्मा ज्योतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करावे - विभागीय आयुक्त जी.श्रीकांत

विशेष वृत्त...

महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करावे – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ),दि.3 (डि-24 न्यूज) :- भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सन २०२७ हे द्विशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने महात्मा जोतीराव फुले यांचे सामाजिक समता, स्त्रीशिक्षण, शेतकरी कल्याण, सामाजिक न्याय आणि मानवमुक्तीविषयक विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व शासकीय विभागांनी आपापल्या स्तरावर वर्षभर विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

     महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १० एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार, दि. ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे. राज्य शासनाने यासाठी महिनानिहाय कृती आराखडाही निश्चित केला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने केवळ शैक्षणिक संस्थांपुरते कार्यक्रम मर्यादित न ठेवता सर्व विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृतीपर उपक्रम राबवून या महापुरुषांचे विचार समाजाच्या घराघरात पोहोचवावेत, असे विभागीय आयुक्तांनी म्हटले आहे.

    या उपक्रमांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांचे सहकार्य घ्यावे. संबंधित विभागांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती, छायाचित्रे आणि वृत्त जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसारित करावे. वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, समाजमाध्यमे तसेच अन्य उपलब्ध प्रसिद्धी माध्यमांचा प्रभावी वापर करून महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याची व्यापक जनजागृती करावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

   राज्य शासनाच्या कृती आराखड्यानुसार जागृती रॅली, भित्तिपत्रक अभियान, जीवनपरिचय सप्ताह, जलसंवर्धन, शेतकरी व जलव्यवस्थापनविषयक उपक्रम, बालसभा आणि स्वच्छता अभियान; सामाजिक समता कथा, चर्चा, ग्रामभेट, समता भिंत आणि समता दौड; वृक्षारोपण, देशभक्तीपर गीत कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, महात्मा फुले साहित्य वाचन अभियान ,शिक्षक गौरव, नवोपक्रम स्पर्धा, विज्ञान व माहिती-तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम; स्त्री सक्षमीकरण, भूमिका अभिनय, पोस्टर स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन आणि महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह, संविधानविषयक पुस्तकांचे वाचन, अभिरूप ग्रामपंचायत व जिल्हा परिषद उपक्रम, पोवाडा स्पर्धा,जनजागृती रॅली,सांस्कृतिक महोत्सव, चित्रकला स्पर्धा, संशोधन, स्थानिक इतिहासाचा अभ्यास, मुलाखती व प्रकल्प सादरीकरण; वादविवाद, निबंध, पोस्टरनिर्मिती आणि प्रकल्प सादरीकरण स्पर्धा; तर मार्चमध्ये समारोप कार्यक्रम, पुरस्कार वितरण, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व शिक्षकांचा विशेष सन्मान,अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

   

   या सर्व उपक्रमांमध्ये सामाजिक समता, स्त्रीशिक्षण, शिक्षणाचे महत्त्व, शेतकरी कल्याण, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विचारांना प्राधान्य देण्यात यावे. विविध विभागांनी त्यांच्या कामकाजाच्या स्वरूपानुसार व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, प्रदर्शन, जनजागृती मोहिमा आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करावेत. तसेच शासनाच्या निर्देशानुसार कार्यक्रमांचे नियोजन करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे.

   छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या आठही जिल्ह्यांतील सर्व शासकीय यंत्रणांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या कार्यातून दिलेला समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow