मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या शहरात विविध विकास कामांचे लोकार्पण...

 0
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या शहरात विविध विकास कामांचे लोकार्पण...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या छत्रपती संभाजीनगरात विविध विकासकामांचे लोकार्पण...

विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, फ्लड लाईट्स व युवा वसतिगृहाचे लोकार्पण...

34 वातानुकूलित ई-बस, ई-व्ही चार्जिंग स्टेशन, सौरऊर्जा प्रकल्प व मिटमिटा शाळेच्या नवीन इमारतीचेही उद्घाटन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31 (डि-24 न्यूज) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये विभागीय क्रीडा संकुलातील अत्याधुनिक क्रीडासुविधा, महानगरपालिकेचे पर्यावरणपूरक वाहतूक व ऊर्जा प्रकल्प तसेच शैक्षणिक सुविधांचा समावेश आहे.

विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित कार्यक्रमात 400 मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल मैदान, स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) व युवा वसतिगृहाचे लोकार्पण होईल.

मराठवाड्यातील खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडासुविधा...

संकुलात 12 कोटी 75 लाख रुपये खर्चून आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक व नैसर्गिक हिरवळीचे फुटबॉल मैदान विकसित करण्यात आले आहे. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी दहा लेन उपलब्ध असून विविध मैदानी स्पर्धांसाठीही सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. दहा हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये चार उंच मास्टवर एकूण 88 दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 11 कोटी 67 लाख 42 हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळेतही खेळाडूंना सराव व स्पर्धांचे आयोजन करता येणार आहे.

याशिवाय चार कोटी रुपयांच्या निधीतून 16 खोल्यांचे युवा वसतिगृह उभारण्यात आले आहे. त्यामध्ये परिषद सभागृह, स्वयंपाकगृह, भोजनगृह, ग्रंथालय व वाचन कक्षाची सुविधा आहे. या सर्व सुविधांमुळे मराठवाड्यातील खेळाडूंना दर्जेदार सराव, प्रशिक्षण व निवासाची सोय एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण...

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 34 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या बसमुळे नागरिकांना आरामदायी, सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळणार आहे. पीएम ई-बस योजनेअंतर्गत आणखी 100 इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचे नियोजन आहे.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी कॅनॉट गार्डन व बाबा पेट्रोल पंपाजवळील भगवान महावीर उड्डाणपुलाखाली ई-व्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. शहरात आणखी दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन विकसित करण्याचे नियोजन आहे.

तसेच सिद्धार्थ उद्यान वाहनतळावर 100 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विजेची बचत होण्यासह पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे.

महानगरपालिकेच्या मिटमिटा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचेही उद्घाटन होणार आहे. या इमारतीत 24 वर्गखोल्या, ग्रंथालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण सुविधा व क्रीडांगणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आधुनिक सुविधांमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चांगले वातावरण उपलब्ध होणार आहे.

देवेंद्र सेवा महोत्सवात ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्य...

दरम्यान, देवेंद्र सेवा महोत्सव समितीतर्फे बीड बायपासवरील जाबिंदा मैदान येथे ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित या महानाट्यातून शिवकालीन इतिहास, शौर्य व स्वराज्याचा प्रेरणादायी प्रवास सादर करण्यात येत आहे.

दि. 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित या महानाट्यास रविवार ,दि. 1 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लाभली आहे. याप्रसंगी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व राज्याचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित राहणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow