SIR अंतर्गत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध, 30 सप्टेंबर पर्यंत दावे व हरकती दाखल करण्याचे आवाहन

 0
SIR अंतर्गत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध, 30 सप्टेंबर पर्यंत दावे व हरकती दाखल करण्याचे आवाहन

विशेष सखोल पुनरिक्षण (SIR)-2026 अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

30 सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करण्याचे आवाहन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31 (डि-24 न्यूज)- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision-SIR)-2026 अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव असल्याची तसेच नाव, पत्ता, वय, लिंग व अन्य तपशील अचूक असल्याची खात्री करावी. आवश्यक असल्यास दावे व हरकती दि. 30 सप्टेंबरपर्यंत दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

मतदार यादी तयार करण्यासाठी दि. 1 ऑक्टोबर 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दावा करता येईल. तसेच मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नावाबाबत अथवा नोंदीतील तपशीलाबाबत आक्षेप असल्यास दि. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत विहित नमुन्यात दावा अथवा हरकत दाखल करता येईल.

दावे व हरकतींसाठी विहित नमुने

मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. 6, मतदार यादीतील नावाच्या समावेशास हरकत घेण्यासाठी अथवा नाव वगळण्यासाठी नमुना क्र. 7, तर मतदार यादीतील नोंदींच्या तपशीलात दुरुस्ती, बदल अथवा अद्ययावत करण्यासाठी नमुना क्र. 8 मध्ये अर्ज करता येईल. हे दावे व हरकती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्याकडे विहित पद्धतीने सादर करता येतील.

दावे व हरकतींची साप्ताहिक प्रसिद्धी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्राप्त दावे व हरकतींची यादी दर आठवड्याला संबंधित मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच दावे व हरकतींबाबतची माहिती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. नागरिकांना आपल्या दाव्याची अथवा हरकतीची स्थिती संबंधित निवडणूक कार्यालयाकडून तपासता येईल.

निर्णयाविरुद्ध अपीलची तरतूद

मतदार नोंदणी अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 24 (अ) अन्वये जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे प्रथम अपील करता येईल. प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध कलम 24 (ब) अन्वये द्वितीय अपील करण्याची तरतूद आहे. द्वितीय अपील मतदार नोंदणी नियम, 1960 मधील विहित पद्धतीनुसार मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे दाखल करता येईल.

दावे व हरकतींवरील निर्णयाविरुद्धचे अपील निर्णय जाहीर झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. प्रथम अपीलीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, छत्रपती संभाजीनगर तर द्वितीय अपीलासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे सक्षम प्राधिकारी आहेत.

मतदारांनी नोंदींची पडताळणी करावी

प्रारूप मतदार यादी प्रत्येक पात्र नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव आणि अन्य तपशील तपासावेत. पात्र असूनही नाव समाविष्ट नसल्यास विहित कालावधीत दावा दाखल करावा. तसेच आक्षेपार्ह अथवा अपात्र नोंद आढळल्यास त्याबाबत हरकत नोंदवावी.

प्रारूप मतदार यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे पाहता येईल. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टल वरही मतदार यादीची पडताळणी करता येईल.

सर्व पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली नोंद तपासावी आणि मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow