राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलन तीव्र करणार, राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय...!
ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलन तीव्र करणार....
राज्य कार्यकारिणी बैठकीतील निर्णय...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) - आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आज सिडको येथील कॉम्रेड व्हीडी देशपांडे स्मारक सभागृहात दिवसभर घेण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष कॉ.प्रा.तानाजी ठोंबरे (बार्शी ) हे होते तर या बैठकीचे प्रास्ताविक करताना महासंघाचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेवराव चव्हाण यांनी गेल्या चार महिन्यापासूनच्या घडामोडींचा तपशीलवार आढावा घेतला.
पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. महासंघाचे कार्याध्यक्ष कॉम्रेड मिलिंद गणवीर (गोंदिया)
यांनी विदर्भातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत व संघटनेच्या स्थितीबाबत यावेळी माहिती दिली.
महाराष्ट्रातील 75000 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनमान्य आर्थिक मागण्या केवळ अंमलबजावणी नसल्यामुळे प्रलंबित आहेत यावर उपस्थित कार्यकारिणी सदस्यांनी चिंता व्यक्त केली. याच्या परिणामी सर्व कर्मचाऱ्यावर प्रचंड आर्थिक अन्याय होत आहे ,वारंवार मोर्चे आंदोलने करून संबंधित खात्याचे मंत्री कसलीच भूमिका घेत नाहीत, निवडणुकीदरम्यान मंत्री महोदय जनतेला
थातूरमातूर आमिषे दाखवतात व आश्वासन देतात मात्र सत्तेत विराजमान झाल्यानंतर त्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडतो असे मत बैठकीत मांडण्यात आले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन, यावलकर समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी, 10 टक्के आरक्षणाप्रमाणे नोकर भरती ,उत्पन्नाची अट रद्द करणे, लोकसंख्येचा आकृतीबंध रद्द करणे या मागण्यांसाठी आगामी काळात जिल्हा पातळीवर उपोषणे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.
तसेच नागपूर येथे मुख्यमंत्री कार्यालयासमोर बेमुदत धरणे आणि दहा टक्के आरक्षणाप्रमाणे भरतीसाठी मुंबईला बेमुदत उपोषण करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांनी बैठकीचा समारोप केला.
कामगार कर्मचाऱ्यावरील केंद्र व राज्य सरकारचे वाढते हल्ले थांबवण्यासाठी कामगारांच्या व्यापक एकजुटीचे प्रयत्न देशभर सुरू असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ही व्यापक एकजूट आणखी मजबूत करावी असे आवाहन प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांनी यावेळी केले.
महात्मा फुले द्विजन्म शताब्दी वर्षानिमित्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय अभ्यास शिबिर प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात आले असून येत्या 11 आणि 12 एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे शिबीर होणार आहे. तर रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे शिबिर जून मध्ये होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या शिबिरांच्या तारखा त्या त्या जिल्हा कमिट्यांच्या बैठका एप्रिल अखेरपर्यंत होऊन निश्चित केल्या जाणार आहेत.
आजच्या कार्यकारीणीच्या बैठकीस कॉ.सखाराम दुर्गुडे ,कॉ. राहुल जाधव , कॉ.हरिश्चंद्र सोनवणे,कॉ. नीलकंठ ढोके,
कॉ.ए.बी.कुलकर्णी,कॉ. सचिन गाडेकर,
कॉ. गजानन खताते
यांनी चर्चेत भागीदारी केली आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड प्रा. राम बाहेती यांनी शुभेच्छा दिल्या. अशी माहिती
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (संलग्न आयटक) राज्य सरचिटणीस काॅ.नामदेव चव्हा
ण यांनी दिली आहे.
What's Your Reaction?