दुध भेसळवर कारवाई सुरू ठेवण्याची आमदार सतीश चव्हाण यांची मागणी...!

 0
दुध भेसळवर कारवाई सुरू ठेवण्याची आमदार सतीश चव्हाण यांची मागणी...!

दुध भेसळ कार्यवाही सुरू ठेवण्याची आमदार सतीश चव्हाण यांची मागणी...!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.18(डि-24 न्यूज)- अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या दूध भेसळविरोधी धडक मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत असून, या मोहिमेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेली ही मोहीम अखंडपणे सुरू राहावी यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

आमदार चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे की, दूध भेसळीला आळा बसल्यामुळे बाजारात शुद्ध दुधाची मागणी वाढण्यास मदत होईल. याचा थेट लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळून त्यांच्या दुधाला योग्य भाव मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असून, काही ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून स्वागतही करण्यात आले आहे.

दूध भेसळीच्या वाढत्या समस्येमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकरी अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडला होता. जनावरांचे संगोपन, चारा, औषधे आणि वाढता उत्पादन खर्च सहन करूनही त्याला अपेक्षित मोबदला मिळत नव्हता. मात्र, तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे प्रथमच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे.

दूध भेसळविरोधातील ही मोहीम केवळ प्रशासकीय कारवाई नसून शेतकऱ्यांच्या घामाला न्याय देणारी लढाई असल्याचे सांगत, श्री. तुकाराम मुंढे यांची किमान तीन वर्षे या पदावरून बदली करू नये आणि त्यांनी सुरू केलेल्या मोहिमेला शासनाने भक्कम पाठबळ द्यावे, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow