एप्रिलमध्ये होणारी पटपडताळणी रद्द करण्याची मागणी...!
या शैक्षणिक वर्षात अगोदरच 2 वेळेस पटपडताळणी केल्यामुळे त्यासंदर्भात धोरण निश्चित करावे, तोपर्यंत एप्रिल महिन्यात होऊ घातलेली पटपडताळणी रद्द करा....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- नियमानुसार दर वर्षी संच मान्यता ह्या दरवर्षी 30 सप्टेंबरच्या विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर करण्यात येतात. परंतु कोरोना काळा नंतर 2022-23 या वर्षी संच मान्यते संदर्भात अनेक पत्र निर्गमित केले गेले, त्यामुळे नेमकी अंतिम तारीख कोणती याविषयी शाळा संभ्रमात राहिल्या. फक्त पटसंख्या ग्राह्य न धरता प्रत्यक्षात आधार प्रमाणित संच मान्यता केल्या गेल्या. लहान-सहान तांत्रिक चुकांमुळे सर्वच विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलीड झाले नव्हते त्यामुळे 6/2/2023 च्या शासन निर्णयात अनेक शाळा अनुदाना पासून वंचित राहिल्यात.
2023-24 व 2024-25 या वर्षी परत 30 सप्टेंबर नुसारच संच मान्यता केल्या गेल्या. संच मान्यता करतांना nic कडून अनेक चुका होतात परिणामी अनेक शाळांना त्यांची संच मान्यता वेळेत मिळाली नाही. त्यामुळे अनेक शाळेना वाढीव टप्पा मिळाला नाही, तर काही शाळेत 2022-23 यावर्षीच्या संच मान्यतेत अतिरिक्त झालेल्या परंतु nic कडून वेळेत संच मान्यता दुरुस्त न झाल्याने सदर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ही झाले नाही व त्यांना वाढीव टप्प्यापासून देखील वंचित राहावे लागले. तर काही शिक्षक नियमीत वेतना पासून वंचित राहत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
काही शाळेंच्या संच मान्यता जनरेट न झाल्याने त्या शाळा अनुदानापासून वंचित राहिल्यात या सर्वांची जबाबदारी कुणाची ...?
त्यात 2025-26 ची संच मान्यता ही 30 सप्टेंबर नुसार न होता वेळोवेळी तारीख वाढवत 23 ऑक्टोंबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती. त्यामुळे देखील संभ्रम निर्माण झाला. त्या आधारावरच आज 80 टक्के शाळेच्या संच मान्यता झाल्यात तर संचालक स्तरावर 20 टक्के शाळेंच्या संच मान्यता अद्यापही प्रलंबित आहेत. तरीही अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रेटून नेल्या जात आहे.
यावर्षी शिक्षकांना सातत्याने BLO ची कामे, निवडणूकांचे प्रशिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन निवडणुकां, आता परत जनगणनेची जबाबदारी, विविध परीक्षा, त्यात आता 31 मार्चच्या पत्रानुसार परत पटपडताळणी आणि त्यात एकही विद्यार्थी कमी /जास्त नोंदवल्या गेल्यास पुन्हा संच मान्यता दुरुस्तीसाठी संचालक कार्यलयात चकरा मारणे, वेतन थांबणे, त्याला किती कालावधी जाणार, अतिरिक्त शिक्षकांचे केलेल्या समायोजनाचे परत प्रश्न निर्माण होणार. यामुळे आमचे शिक्षक तणावात आले असून त्यांची मानसिकता प्रचंड खराब झाली आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने विविध विषयांचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे अधिकार काढून आयुक्त कार्यालयाकडे अधिकारांचे केंद्रीकरण करण्यात येत आहेत. तसेच संच मान्यता दुरुस्ती संदर्भात अगोदरच खूप समस्या आहेत त्यामुळे नव्याने समस्या निर्माण करण्या ऐवजी पुढील शैक्षणिक वर्षात संच मान्यतेसाठी एकच तारीख निश्चित करून वार्षिक तपासणी करून संच मान्यता अंतिम करण्यात याव्यात.
या शैक्षणिक वर्षात अगोदरच दोन वेळेस पटपडताळणी करण्यात आली. आता परत तिसरी पटपडताळणी करण्याचे काय प्रयोजन. पटपडताळणी संदर्भात शासनाने एकच धोरण निश्चित करावे व पुढील वर्षी पटपडताळणी करावी.
तसेच यानंतर ऑनलाइन संच मान्यता ही प्रक्रिया न राबवता पायाभूत पदांमध्ये वाढ होणार नाही या अटींवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाच ऑफलाईन पद्धतीने संच मान्यता करण्याचे अधिकार देण्यात यावेत.
या आशयाचे निवेदन छत्रपती सभाजीनगरचे विभागीय शिक्षण उपसंचालक श्री कैलास दातखीळ साहेब यांना देण्यात आले. यावेळी प्रा. मनोज पाटील, सुनिल जाधव, आनंद खरात, राजेंद्र जाधव, महेश पाटील, विजय द्वारकुंडे, भास्कर म्हस्के, संतोष जैस्वाल, धनपाल खोकड, सय्यद मोईन, गजानन दिग्रस्कर, विनायक एलम, योगेश पाटील, गणेश वरकड यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?