राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु उद्या उदगीरमध्ये, नांदेडलाही जाणार
 
                                राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या उदगीरमध्ये
राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत महिलांचा आनंद मेळावा
उदगीरच्या विश्वशांती बुद्ध विहाराचे आज होणार लोकार्पण
लातूर (उदगीर) दि.3(डि-24 न्यूज) मराठवाड्यातील ऐतिहासिक नगरी असणाऱ्या उदगीरला भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, 4 सप्टेंबरला सकाळी सव्वा अकरा वाजता येणार आहेत. त्यांच्यासोबत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही आगमन होणार आहे.
त्यांच्या आगमनासाठी शहर सजले असून महिलांचा आनंद मेळावा व विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण उद्याचे प्रमुख आकर्षण आहे.
मराठवाड्याच्या प्रथम दौऱ्यावर येत असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या सकाळी नांदेड येथे विशेष विमानाने येत असून त्या ठिकाणावरून हेलिकॉप्टरने उदगीरला येत आहे.
राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन गेल्या अनेक दिवसांपासून या आयोजनासाठी झटत असून उद्या राष्ट्रपतींचे उदगीर येथे आगमन होणार आहे. त्यानंतर त्या उदगीर शहराच्या तळवेस भागात असणाऱ्या विश्वशांती बुद्ध विहाराच्या लोकार्पणाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर उदयगिरी कॉलेज मैदानावर आयोजित महिला आनंद मेळाव्याला त्या सहभागी होतील. या कार्यक्रमांमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
राज्य शासनाने या ठिकाणी शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व अन्य लाभाच्या योजनांच्या कार्यक्रमांचा आनंद मेळावा आयोजित केला आहे. हजारो महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. उद्या राष्ट्रपती महिलांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून जिल्हाभरातील महिलांना उद्याच्या कार्यक्रमाची उत्सुकता आहे.
राष्ट्रपती कार्यक्रमानंतर पुन्हा नांदेडकडे प्रयाण करतील. नांदेड वरून त्या दिल्लीला रवाना होणार आहेत. राष्ट्रपती गेल्या दोन तारखेपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत उद्या त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा अखेरचा दिवस असून जाताना त्या नांदेड येथे तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात दर्शन घेणार आहेत.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            