शहरात दिवाळीच्या खरेदीचा उच्चांक, बाजारपेठेत गर्दीमुळे ट्राफीक

 0
शहरात दिवाळीच्या खरेदीचा उच्चांक, बाजारपेठेत गर्दीमुळे ट्राफीक

शहरात दिवाळीच्या खरेदीचा उच्चांक, बाजारपेठेत गर्दीमुळे ट्राफीक 

पैठण गेट, तिलकपथ, निराला बाजार, औरंगपुरा, टिव्ही सेंटर, हडकोतील बाजारपेठ गजबजलेल्या... व्यापारी खूश, मनपा आणि पोलीस प्रशासन बंदोबस्तात तैनात.... उद्या लक्ष्मीपूजन....

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)- शहरातील पैठणगेट, टिळकपथ, औरंगपुरा, गुलमंडी, मछलीखडक, निरालाबाजार, उस्मानपुरा, जवाहर कॉलनी, शिवाजीनगर, बीडबायपास, जालना रोड, कॅनॉट प्लेस, सिडको, अविष्कार कॉलनी, बजरंग चौक आणि हडको परिसरातील बाजारपेठा ग्राहकांनी गजबजल्या आहेत. अनेक दुकानांमध्ये कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र आहे.

रेडिमेड फराळाला पसंती

दिवाळीनिमित्त घरगुती फराळासोबतच बाजारात उपलब्ध असलेल्या रेडिमेड फराळालाही ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. तयार चिवडा, लाडू, चकली यांसह विविध खाद्यपदार्थ खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. तसेच घर सजविण्यासाठी आकर्षक आकाशकंदील, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि लक्ष्मीपूजनाच्या साहित्याची खरेदी केली जात आहे.

फटाक्यांच्या खरेदीसाठी गर्दी

दिवाळीच्या शेवटच्या टप्प्यात फटाक्यांच्या दुकानांवरही ग्राहकांची गर्दी वाढली आहे. विविध प्रकारचे फटाके खरेदी करण्यासाठी लहान मुलांसह मोठ्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे. दिवसभर बाजारपेठेत सुरू असलेल्या खरेदीच्या धामधुमीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. एकूणच लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज या सणांसाठी खास कुर्ता खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. विशेषतः तरुण ग्राहक शॉर्ट कुर्त्यांना पसंती देत असून ज्येष्ठ आणि मध्यमवयीन ग्राहकांकडून पारंपरिक डिझाइन्सची मागणी कायम आहे. जीन्स, शर्ट, टि-शर्ट ब्राण्डेड खरेदीसाठी ग्राहकांचा कल आहे वाजवी दरात माॅडर्न शाॅपीमध्ये विविध कंपन्यांचे ब्राण्डेड कपडे उपलब्ध आहे असे दुकानदार इरफान खान यांनी सांगितले.

1 ते 5 हजारांपर्यंत कुर्त्यांचे दर...

बाजारपेठेत साध्या कुर्त्यांपासून ते आकर्षक डिझायनर कुर्त्यांपर्यंत विविध प्रकार उपलब्ध असून त्यांचे दर साधारण एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत आहेत. ग्राहकांच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार दुकानदारांकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

याबाबत व्यापारी म्हणाले की, कुर्ता-पायजामा आता केवळ सणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तरुणाईसाठी तो स्टाइल स्टेटमेंट बनला आहे. पारंपरिक कुर्त्यांची शान आणि शॉर्ट कुर्त्यांचा आधुनिक अंदाज यामुळे यंदा पुरुषांच्या फॅशनमध्ये कुर्त्यांची विशेष चलती आहे. दिवाळीच्या निमित्ताने कुर्ता-पायजाम्यांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

एकंदरीत, यंदाच्या दिवाळीत पारंपरिक पेहराव आणि आधुनिक फॅशन यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळत असून पुरुषांच्या कपड्यांच्या खरेदीत कुर्ता-पायजाम्यांनी विशेष स्थान

मिळवले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow