आरोग्य विभागात मोठे षडयंत्र, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल होताच तीन अधिकारी फरार...! डॉक्टरला मुन्नाभाई बनवणे आले अंगलट

आरोग्य विभागाचे मोठे षडयंत्र...तात्कालिन सुधाकर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी नासेर अहेमद खान, आरोग्य सेवक किरण सोनवणे गुन्हा दाखल होताच फरार...
आरोग्य अधिकारी डॉ. मोहसीन खान
बनावट कागदपत्र आधारे खऱ्या डॉक्टरास दाखवले तोतया व मुन्नाभाई.... तात्कालिन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर दाखल झाला गुन्हा....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)
आरोग्य विभागातील अधिकारी पैशासाठी किती खालच्या थरावर जाऊ शकतात याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. तत्कालीन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहसीन खान सिल्लोड तालुक्यात कार्यरत असताना त्यांच्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर धानोरकर यांनी दिनांक 18.04.2023 रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यात मोहसीन खान यांच्यावर आरोप होता की, त्यांचे डिग्री ही बनावट/ बोगस आहे. त्यावेळेस मोहसीन खान तोतया डॉक्टर व मुन्नाभाई अशा बातम्या सगळीकडे झळाकल्या होत्या. सदर घटनेनंतर डॉक्टर मोहसीन खान यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.
याच प्रकरणात काल जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर सोन्याबापू शेळके, तालुका आरोग्य अधिकारी सिल्लोड नासेर अहेमद खान व आरोग्य सेवक पालोद किरण मोतीराम सोनवणे यांच्यावर छावनी पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे कलम 465, 467, 471, 420, 201, 120-B व 34 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहसीन खान यांनी दाखल केलेल्या तक्रारी अनुसार दाखल झाला आहे. त्यामुळे सदरील प्रकरणाला आता पूर्णपणे वेगळीच कलाटणी मिळालेली आहे.
सदरील एफआयआर मध्ये नमूद अनुसार, डॉक्टर नासेर अहमद खान यांनी सिल्लोड आरोग्य अधिकारी पदावर त्यांची नेमणूक व्हावी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तगादा लावला होता. त्यांनी दिलेल्या निवेदन मुळे डॉक्टर सुधाकर शेळके जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डॉक्टर मोहसीन खान यांची वेळोवेळी प्रतिनियुक्ती करत होते. त्याबाबत डॉक्टर मोहसीन खान यांनी विचारणा केली असता त्यांनी तीस हजार रुपयाची मागणी केली, नसता वारंवार प्रतिनियुक्ती करीतच राहील असे धमकी दिली. मोहसीन खान यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे त्यांच्यावर महिला कर्मचारी मार्फत छेडछाडीच्या खोट्या तक्रारी देण्यात आल्या.
आपल्यावर होत असलेल्या अन्याय व अत्याचार याबाबत मोहसिन खान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे डॉक्टर नासेर खान, डॉक्टर सुधाकर शेळके व किरण सोनवणे यांनी मोहसीन खान यांच्याविरुद्ध मोठे षडयंत्र रचले. सगळ्यांनी मिळून मोहसीन खान यांचे बनावट व खोटे डिग्रीचे कागदपत्रे तयार केले. सदर कागदपत्राच्या आधारे डॉक्टर मोहसीन खान यांची डिग्री कशी बनावट व खोटी आहे, याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार डॉक्टर मोहसीन खान यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले.
डॉक्टर मोहसीन खान यांनी त्यांच्याविरुद्ध असलेल्या या षड्यंत्र व कपटकारस्थानाचा कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी स्वतः निर्दोष असल्याचे पुरावे जमा करण्यास सुरुवात केली. सर्व पुरावे जमा करून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपली बाजू मांडली व आपण निर्दोष असल्याचे सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपासणीच्या वेळी मोहसीन खान यांचे ओरिजनल व खरे कागदपत्रे डॉक्टर शेळके यांच्या घरातून पोलिसांनी जमा केले आहेत. तसेच माझी शैक्षणिक डिग्री साई आयुर्वेदिक कॉलेज अलीगढ येथील नसून वीर बहादूर पूर्वांचल विद्यापीठ जोनपुर उत्तर प्रदेश येथील असल्याचे खात्री झालेली आहे. डॉक्टर शेळके हे सक्तीच्या रजेवर असताना सुद्धा कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचे बेकायदेशीर आदेश दिलेले आहेत.
जमा केलेल्या पुराव्याच्या आधारे डॉक्टर मोहसीन खान यांनी डॉक्टर शेळके, नासेर खान, किरण सोनवणे यांच्याविरुद्ध छावणी पोलीस स्टेशन येथे दिनांक 26.09.2024 रोजी फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु संबंधित प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे डॉक्टर मोहसीन खान यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात कलम 175(3) BNS अनुसार दाद मागितली होती. न्यायालयात सर्व कायदेशीर बाजू तपासल्यानंतर प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आले. अधिकाऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे आरोग्य विभागात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल होताच तीघे आरोपी फरार झाले आहे त्यांना अटक करण्यासाठी पोलिस कसून तपास करत आहे.
फिर्यादी डॉ.मोहसीन खान यांची प्रतिक्रिया...
डॉक्टर सुधाकर शेळके, नासेर अहमद खान व किरण सोनवणे या तिघांनी मिळून माझ्या विरुद्ध संगणमत करून कपट-कारस्थान रचून, माझे शैक्षणिक डिग्री चे खोटे व बनावट कागदपत्रे तयार केले. कारण नासेर खान यांना माझ्या पदावर नियुक्ती हवी होती. तसेच वरिष्ठांना माझ्याकडून लाचेची अपेक्षा होती. मी त्यांचे षडयंत्र उघड करण्याचे प्रयत्न केले असता, माझ्यावर महिला कर्मचारी यांच्या छेडछाडीचे गंभीर खोटे आरोप लावण्यात आले. संबंधित लोकांनी स्वतःच्या आर्थिक लाभ व फायद्यासाठी माझे संपूर्ण आयुष्य व करिअर उद्ध्वस्त केलेले आहे. आज त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला असून, लवकरच त्यांना कायदेशीर शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे. लवकरच कायदेशीर लढ्यात माझा विजय होईल व मला न्याय मिळेल, जनमानसात माझी मलीन झालेली प्रतिमा पुन्हा पूर्वीसारखी होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. आरोग्य विभागाच्या स्वतःच्या स्वार्थाचा व षडयंत्राचा मी बळी ठरलेलो आहे.
What's Your Reaction?






