शहराला किमान दोन दिवसाआड तरी पाणी द्या - अंबादास दानवे

शहराला किमान दोन दिवसांआड तरी पाणी द्या
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मनपा प्रशासनाकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) शहरातील गंभीर पाणीटंचाई आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे मनपा आयुक्त यांचे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज 24 एप्रिल रोजी बैठक संपन्न झाली. संभाजीनगरकरांना किमान दोन दिवसांआड तरी पाणी द्या अशी मागणी शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या "लबाडांनो पाणी द्या" या जन आंदोलन अंतर्गत संभाजीनगरातील नागरिकांनी पाणी प्रश्नांवर मांडलेल्या प्रश्नांची माहिती दानवे यांनी मनपा आयुक्त यांना दिली. मनपा पातळीवरील पाणी गुणवत्ता समिती अस्तिवात नाही. जीन्सी परीसरात पाणी आवश्यक वेळेपर्यंत सोडविले जात नाही. रात्री बेरात्री पाणी सोडले जात असून हनुमान टेकडी येथील पाण्याच्या टाकीला गळती लागल्याच्या नागरिकांनी केलेल्या तक्रारी अंबादास दानवे यांनी मनपा आयुक्त यांच्यासमोर मांडून त्या सोडविण्याच्या सूचना केल्या.
विविध पाईप लाईनच्या माध्यमातून 150 एमएलडी पाणी आज रोजी शहरात येते. संभाजीनगरची आज रोजी अंदाजे 18 लाख लोकसंख्या असून ही लोकसंख्या प्रमाण माणून 270 एमएलडी पाण्याची शहराला आवश्यकता आहे. शहरात आज रोजी दोन दिवसाआड 300 एमएलडी पाणी येते तर नागरिकांना 10 ते 11 दिवसाला पाणी का ? येते असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित करून ही स्थिती दुरुस्त करण्याची सूचना केली.
शहरात ठिकठिकाणी फ्लो मीटर नाहीये, त्यामुळे पाण्याची चोरी कोठून होते याची माहिती मिळत नाही. नागरिक आवश्यक नसताना पाण्याचा चुकीचा वापर करतात. शहराची पाण्याची वितरण व्यवस्था 1975 ची असून गुढीपाडवा आणि ईदच्या सणाच्या काळात 1200 मिमी व्यासाची पाईप लाईन आणि हर्सूल तलावातील पाईप लाईन शेवाळने बंद पडली असल्याने शहरात पाण्याची दुरवस्था निर्माण झाल्याची कबुली मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.
याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरीभाऊ हिवाळे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, नंदू लबडे, दिनेशराजे भोसले व मनपा अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






