शहरात अकरा ठिकाणी आयकराच्या छापे, बडे बिल्डरांवर कार्यवाही

 0
शहरात अकरा ठिकाणी आयकराच्या छापे, बडे बिल्डरांवर कार्यवाही

शहरातील बडे बिल्डरांवर आयकरचे छापे...11 ठिकाणी छापेमारीने खळबळ...

एकाच वेळी 11 ठिकाणी धडकले 200 अधिकारी कर्मचारी

मंजीत प्राईड ग्रुप, दिशा ग्रुप, लाभशेटवार यांच्या कार्यालयाची तपासणी...

औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) शहरातील बड्या बिल्डर लॉबीवर एकाच वेळी आयकर विभागाने धाडी टाकल्याने खळबळ उडाली आहे. आज 30 नोव्हेंबर पहाटे आयकरचे बडे अधिकारी- कर्मचारी असा अंदाजे 200 जणांचा ताफा 11 बड्या बिल्डरच्या बंगले अन कार्यालयात घुसला. या कारवाईने शहरातील बांधकाम क्षेत्र हादरले आहे. मंजीत प्राईड, दिशा ग्रुप यासह लाभशेटवार आदी बडे बिल्डरांवर छापे पडल्याचे सुत्रांनी सांगितले. या कारवाईबाबत आयकर विभागाने मोठी गुप्तता पाळली असून किमान दोन दिवस ही कारवाई चालणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. आयकर विभागाच्या या कारवाईने शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

राज्यातील नाशिकसह अनेक शहरात आयकर विभागाने आज छापेमारी केली. शहरातीलही अनेक प्रतिष्ठीत बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने एकाच वेळी कारवाई केली. आयकर विभागाने अतिशय गुप्तपणे ही कारवाई केली आहे. आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी बुधवारी सायंकाळीच शहरात दाखल झाले होते. कुणालाही माहिती लागू नये यासाठी सरकारी कार ऐवजी खाजगी गाड्यांमधून जवळपास 200 अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा शहरात दाखल झाला. सकाळी 6.30 वाजेपासूनच कारवाईला सुरूवात झाली. रेल्वेस्टेशन परिसरातील काही बिल्डरांच्या बंगल्यात आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले. त्याचबरोबर इतर प्रत्येकी 8 ते 10 अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक वेगवेगळ्या बिल्डरांच्या घर आणि कार्यालयात दाखल झाले. शहरातील मोठ्या आणि प्रतिष्ठीत बांधकाम व्यावसायिकांच्या बंगले आणि कार्यालयांवर एकाच वेळी हा छापा टाकण्यात आला आहे.

या बिल्डरांवर पडले छापे...

मनजित प्राईड, दिशा ग्रुप, मनजीत कॉटन, अनिल मुनोत, मनोज काला, मनोज रूणवाल, लाभशेटवार ग्रुप, गादीया ग्रुप आदी बिल्डर आणि बांधकाम प्रतिष्ठाणांवर आयकर विभागाने छापा टाकल्याचे सुत्रांनी सांगितले.

अनेकांचे मंत्र्यांशी लागबांधे

शहरातील बिल्डर लॉबीचे बड्या राजकीय मंडळींशी लागेबांधे आहेत. अनेक बांधकाम प्रतिष्ठानांचे तर राज्यातील मंत्री आणि सत्तेतील घनिष्ठ वर्तूळातही उठबस आहे. अशा वेळी आयकर विभागाने केलेल्या कारवाईने बांधकाम क्षेत्र हादरले आहे. ही कारवाई दोन तीन दिवस चालणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

तपासली कागदपत्रे...

आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात बिल्डरांच्या घर आणि कार्यालयातून अनेक दस्तावेज हस्तगत केल्याचे समजते. कोणते प्रकल्प आणि त्यावरची गुंतवणूक याचीही माहिती आयकर विभागाकडू गोळा केली जात असेल्याचे सुत्रांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow