आदर्श घोटाळ्यातील मुख्य आरोपी अंबादास मानकापे यांचा जामीन अर्ज फेटाळला...!

 0
आदर्श घोटाळ्यातील मुख्य आरोपी अंबादास मानकापे यांचा जामीन अर्ज फेटाळला...!

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधींचा गैरव्यवहार – मुख्य आरोपी अंबादास मानकापे यांचा जामीन अर्ज नामंजूर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या अंबादास आबाजी मानकापे यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश शौकत एस. गोरवडे यांनी हा अर्ज फेटाळला. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. कोमल कंधारकर यांनी जोरदार युक्तिवाद केला, तर आरोपीतर्फे ॲड. व्ही. बी. गरुड यांनी युक्तिवाद केला.

सन 2019 ते 2022 या तीन आर्थिक वर्षांत पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षण अहवालातून समोर आले आहे. संस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे व संचालक मंडळाने बनावट कर्ज प्रकरणे तयार करून कोट्यवधींची कर्जे वितरित केली. या प्रकरणात पतसंस्थेचे अनेक संचालक, व्यवस्थापक, कर्जदार, जामीनदार आणि संबंधित अधिकारी यांचा सहभाग उघड झाला आहे. तपासादरम्यान असे आढळून आले की, पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने एकमेकांना जामीनदार करून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. काही संचालक व त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतःच्या मालकीच्या नऊ संस्थांना कोट्यवधी रुपयांची कर्जे मंजूर करून अपहार केला. काही प्रकरणांमध्ये जामीनदार बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वितरित करण्यात आले.

तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर असे महत्त्वाचे कारणे मांडली की, अंबादास मानकापे हे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रवर्तक व अध्यक्ष असून, त्यांच्या मंजुरीनेच हा गैरव्यवहार घडला. आरोपीने स्वतःच्या व संचालक मंडळाच्या संस्थांना मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित केले आहे. काही कर्जदारांकडून आधीची थकीत कर्जरक्कम भरल्याचे दाखवून त्याच दिवशी नवीन कोट्यवधींची कर्जे वितरित करण्यात आली. लेखापरीक्षण अहवालानुसार, संचालक मंडळाने ठेवीदारांचे पैसे गैरव्यवहाराच्या उद्देशाने वितरित केले. आरोपी जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो आणि पुरावे नष्ट करू शकतो. गुन्ह्याच्या तपासासाठी फॉरेन्सिक ऑडिट प्रक्रिया सुरू असून, यात आणखी धक्कादायक आर्थिक व्यवहार उघड होण्याची शक्यता आहे. आरोपी आणि पतसंस्थेच्या नावावरील संपत्ती शासनाने संरक्षित केली आहे.

या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी काही फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान, संचालक व व्यवस्थापकांच्या नावावरील स्थावर मालमत्ता, पतसंस्थेच्या नावे असलेली वाहने आणि विविध बँक खाती जप्त करण्यात आली आहेत. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना नमूद केले की, "या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून, आरोपीस जामीन मंजूर केल्यास तो पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो. तसेच ठेवीदारांमध्ये संतापाची भावना निर्माण होऊ शकते."

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या अंबादास मानकापे यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींविरोधातील पुरावे अधिकाधिक बळकट होत आहेत. ठेवीदारांनी आपल्या आयुष्यभराची बचत पतसंस्थेत जमा केली होती, परंतु संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अपहारामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. राज्य सरकार आणि तपास यंत्रणांनी या प्रकरणात कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा द्यावी, अशी मागणी ठेवीदारांकडून होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow