कटकट गेट परिसरात काळोख... अघोषित लोडशेडींग सुरू झाली का...?

 0
कटकट गेट परिसरात काळोख... अघोषित लोडशेडींग सुरू झाली का...?

कटकट गेट परिसरात काळोख; अघोषित लोडशेडिंग सुरू झाली का...?

दोन-दोन तास वीज गुल होत असल्याने नागरिक त्रस्त; महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 7 (डि-24 न्यूज) : कटकट गेट, नेहरू नगर, नाहिद नगर, बाबर कॉलनी, किराडपुरा परिसरातील काही भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी रात्री 11 वाजल्यापासून काही भागातील वीजपुरवठा बंद झाल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले.

ऑक्टोबर हिटमुळे तापमानात वाढ होत असताना अचानक दोन-दोन तास वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. पहाटे पाच वाजताही या परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. तब्बल दोन तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यानंतर पुन्हा रात्रीच्या सुमारास वीज गायब झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने लहान बालके तसेच ज्येष्ठ नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी महावितरणकडे संपर्क साधला असता, ‘वरून आदेश आल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे,’ असे उत्तर मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मात्र, वीजपुरवठा नेमका कोणत्या कारणामुळे बंद करण्यात आला आहे, किती वेळ बंद राहणार आहे आणि तो कधी सुरळीत होणार याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

शहरातील विविध भागात अशाच प्रकारे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने अघोषित लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे का...? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जर वीजपुरवठा नियोजित पद्धतीने बंद केला जात असेल, तर त्याची पूर्वकल्पना वीजग्राहकांना देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महावितरणने या प्रकाराची दखल घेऊन कटकट गेटसह परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण स्पष्ट करावे आणि वारंवार होणारे वीजखंडित होण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow