संजय गांधी निराधार योजनेचे हजारो फाईली प्रलंबित, काँग्रेस दिव्यांग सेलचे प्रशासनाला निवेदन
संजय गांधी निराधार योजनेच्या हजारो फाईली प्रलंबित; काँग्रेस दिव्यांग सेलचे प्रशासनाला निवेदन
तहसीलदारांना दिले निवेदन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 6 (डि-24 न्यूज) – संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग, निराधार, विधवा महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर अर्जांच्या फाईली गेल्या 15 ते 16 दिवसांपासून तलाठी व तहसील कार्यालयांमध्ये प्रलंबित असल्याने पात्र लाभार्थ्यांना शासकीय मदत वेळेत मिळत नसल्याचा आरोप काँग्रेस दिव्यांग प्रकोष्ठाने केला आहे. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लाभार्थ्यांना वारंवार "वेबसाईट बंद आहे" असे कारण देत परत पाठवले जात आहे. त्यामुळे नवीन अर्ज मंजुरीची प्रक्रिया तसेच पूर्वीपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या निकाली काढण्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून गरजू नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच विविध स्तरांवर सुमारे तीन हजार फाईली प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांचा तातडीने आढावा घेऊन पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेची वेबसाईट तातडीने सुरळीत सुरू करणे, तलाठी व तहसील कार्यालयांमधील प्रलंबित फाईलींची त्वरित तपासणी करून त्यांचा निपटारा करणे, सर्व प्रलंबित व मंजूर प्रकरणांचे पुनर्विलोकन करून लाभार्थ्यांपर्यंत आर्थिक सहाय्य पोहोचविणे, मंजूर लाभार्थ्यांना कोणताही विलंब न करता नोटीस देऊन योजनेचा लाभ उपलब्ध करून देणे तसेच शासनाच्या जीआरनुसार दिव्यांग, निराधार, विधवा महिला व ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना योजनेचा लाभ मिळेल याची खात्री करणे, अशा मागण्यांचा समावेश आहे.
या निवेदनावर काँग्रेस दिव्यांग सेलचे शहराध्यक्ष मिर्झा झकी बेग, जिल्हाध्यक्ष मुदस्सिर अन्सारी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून पात्र लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
What's Your Reaction?