महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी व लिपिक एसिबीच्या जाळ्यात...!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : सिडकोतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि लिपिक 20 हजारांची लाच घेताना जाळ्यात
छत्रपती संभाजीनगर/जालना, दि.6(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथील मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि एका कार्यालयीन लिपिकाला 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साधना सदाशिवराव बांगर (वय 44), मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि पठाण मुजीबखान यासीनखान (वय 48), कार्यालयीन लिपिक यांचा समावेश आहे.
तक्रारदाराने क्षेत्रीय कामकाजासाठी भाडेतत्त्वावर पुरविलेल्या वाहनाचे जानेवारी 2025 ते मे 2026 या कालावधीतील सुमारे 13,34,851 रुपयांचे प्रलंबित बिल सादर केले आहे त्यापैकी 3,24,840 रुपयांचे बील तक्रारदार यांना मिळणे बाकी आहे मंजूर करण्यासाठी आरोपींनी बिलाच्या रकमेच्या 5 टक्के दराने लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर 20 हजार रुपयांवर व्यवहार ठरला.
तक्रारदाराने याबाबत जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून सोमवारी सिडको कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी कार्यालयीन लिपिक पठाण याने तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले. तपासादरम्यान ही रक्कम मुख्य लेखा व वित्त अधिकारी साधना बांगर यांच्या सांगण्यावरून स्वीकारण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हि कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती कोमल शिंदे व अंमलदार आणि पथकाने केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) जालना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी स्वतः किंवा मध्यस्थामार्फत लाचेची मागणी करत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
What's Your Reaction?