पडेगाव कचरा प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त कचरा तातडीने चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची अंबादास दानवेंची मागणी...!
पडेगाव कचरा प्रकल्पाची तातडीने चौकशी करा...
क्षमतेपेक्षा जास्त कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा...
आमदार अंबादास दानवेची विधान परिषदेत मागणी...
मुंबई / छत्रपती संभाजीनगर, दि.7(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असून, वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया न झाल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात डम्पिंग ग्राउंड बनल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला. या प्रकल्पाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच साठलेला कचरा कालबद्ध पद्धतीने हटविण्याची मागणी दानवे यांनी राज्य सरकारकडे केली.
प्रकल्पाची क्षमता मर्यादित असतानाही मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रचंड ढिगारे निर्माण झाले असून मिथेन वायू, विषारी वायूंचे उत्सर्जन आणि दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. वारंवार कचऱ्याला आग लागण्याच्या घटनांमुळे वायू प्रदूषणाची समस्याही अधिक गंभीर बनली असल्याचे अंबादास दानवे यांनी सभागृहात सांगितले.
पडेगाव परिसरातील नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी झाल्याचा दावा चुकीचा आहे. त्या भागासाठी स्वतंत्र आरोग्य सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली.
पडेगाव व चिकलठाणा येथील कचरा प्रकल्पांवर शासनाने सुमारे 67 कोटी रुपये खर्च केले असूनही अपेक्षित परिणाम दिसत नाही. कचऱ्यापासून खतनिर्मिती, प्लास्टिक प्रक्रिया आणि इतर उपक्रमांचा कोणताही पारदर्शक हिशेब नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.
वायू व जलप्रदूषणाची नियमित तपासणी व्हावी, तसेच लिचेट (कचऱ्यातून तयार होणाऱ्या दूषित द्रव) प्रक्रिया यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत आहे की नाही, याचीही चौकशी करावी. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पडेगाव प्रकल्पातील प्रदूषणाचा मोठा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त कचरा टाकणे तातडीने थांबवावे, साठलेला कचरा वैज्ञानिक पद्धतीने हटवावा आणि संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात केली.
What's Your Reaction?