मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील अक्रामक, 58 लाख कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी, वाघमारे यांच्या कथीत वक्तव्याने वाद...
मराठा आरक्षणावरून जरांगे आक्रमक; 58 लाख कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी...
वाघमारे यांच्या कथीत वक्तव्याने मराठा समाजात संताप, मराठा-ओबीसी वाद पुन्हा सुरू...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)- मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. मराठ्यांच्या 58 लाख कुणबी नोंदी असून, या नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्रे आणि जात पडताळणी करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सध्या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे-पाटील यांनी रुग्णालयातूनच पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला. सरकारने कुणबी नोंदींमध्ये एकही नोंद कमी करू नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला.
20 ते 25 ऑगस्टदरम्यान मराठवाडा-विदर्भ दौरा
आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी जरांगे-पाटील 20 ते 25 ऑगस्टदरम्यान मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार आहेत. अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या भागांमध्येही ते जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकृतीमुळे दौरा शक्य झाला नाही, तर मराठा समाज आणि युवकांनी आपापल्या भागात जबाबदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत उपोषण
29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे जरांगे-पाटील यांनी सांगितले. हे उपोषण शांततेच्या मार्गाने करण्यात येईल, मात्र अन्याय झाल्यास मराठा समाजाने आक्रमकपणे आवाज उठवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे- भुमरे-शिरसाटांवर टीका...
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट व खासदार संदीपान भुमरे यांच्यावरही जरांगे-पाटील यांनी टीका केली. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत हे नेते जाणूनबुजून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 58 लाख नोंदींपैकी एकही नोंद कमी केली तर सरकारला सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या कथित वक्तव्यावरून वाद...
ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील तरुणींबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या वक्तव्याचा मराठा समाजातून निषेध केला जात असून, जरांगे-पाटील यांनीही वाघमारे यांच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून अचानक कोणताही निर्णय होऊ शकतो, असा दावा जरांगे-पाटील यांनी केला आहे. त्यामुळे 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी सरकार काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?