छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या भरती परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार...!

 0
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या भरती परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार...!

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या भरती परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार

छत्रपती संभाजीनगर, दि. ७ जुलै : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या लेखी ऑनलाइन परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या 222 पदांसाठी 8 जूलै रोजी 3 सत्रात आणि 9 जुलै 2026 रोजी 2 सत्रात राज्यातील 18 शहरांतील 31 परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही उमेदवारांनी ई-मेल, भ्रमणध्वनी आणि संदेशाद्वारे केली होती. तसेच सोशल मीडियावर परीक्षा पुढे ढकलल्याच्या अफवाही पसरत होत्या.

यासंदर्भात महापालिका प्रशासनाने मुंबई, पुणे, नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, स्थानिक प्रशासन तसेच IBPS संस्थेशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार 8 व 9 जुलै रोजी पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या पहिल्या पसंतीच्या शहरातच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. तसेच सर्व 31 परीक्षा केंद्रांची पाहणी पूर्ण झाली असून परीक्षेसाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

त्यामुळे 8 व 9 जुलै 2026 रोजी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नियोजित वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. तसेच उमेदवारांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या नियोजित वेळेत 30 मिनिटांची अतिरिक्त सवलत देण्यात आल्याची माहितीही प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow