सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुमती याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाचे आदेश कायम...

 0
सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुमती याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाचे आदेश कायम...

सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुमती याचिका फेटाळली

मौलाना मोहम्मद अली जौहर शिक्षण संस्थेच्या भरती प्रक्रियेवरील उच्च न्यायालयाचा आदेश कायम

नवी दिल्ली, दि. 27 (डि-24 न्यूज) : पठाण बनेखा नूरखा यांनी मौलाना मोहम्मद अली जौहर एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष शेख मोहम्मद कैसर आझाद व इतरांविरुद्ध दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (Special Leave Petition) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला अंतिम आदेश कायम राहिला आहे.

सदर विशेष अनुमती याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 2 जुलै 2026 रोजी रिट याचिका क्रमांक 8431/2024 व 8446/2024 मध्ये दिलेल्या अंतिम निर्णयाविरोधात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची 22 ऑगस्ट 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणातील कागदपत्रे व उपलब्ध नोंदींचा सविस्तर विचार केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यासारखी कोणतीही त्रुटी आढळत नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी संबंधित विषयासंदर्भात नवीन शासन निर्णय (G.R.) जारी झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हा शासन निर्णय उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या एक दिवस आधी जारी झाला होता. मात्र, तो अनवधानाने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणता आला नसल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले.

याचिकाकर्त्यांकडून भविष्यातील भरती प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राबवू नये, अशी विनंतीही करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका फेटाळल्याने उच्च न्यायालयाचा आदेश कायम राहिला आहे.

या निर्णयामुळे संस्थेतील भरती प्रक्रियेसंदर्भातील कायदेशीर स्थिती स्पष्ट झाली असून, शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि संस्थेतील शैक्षणिक कामकाज सुरळीत सुरू राहावे, अशी अपेक्षा शिक्षणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैसर आझाद शेख यांच्या भूमिकेचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत असून, त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow