चोरीचे 13 टन लोखंडी स्टील व 20 हजार लिटर केमिकल जप्त, वैजापूर पोलिसांची मोठी कारवाई...!
चोरीचे 13 टन लोखंडी स्टील व 20 हजार लिटर केमिकल जप्त
वैजापूर पोलिसांची मोठी कारवाई; 12 लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
वैजापूर, दि.28 (डि-24 न्यूज) :- वैजापूर ते गंगापूर रोडवरील जांबरगाव शिवारातील एका शेतात चोरीचे लोखंडी स्टील आणि केमिकल बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 13 टन लोखंडी स्टील आणि सुमारे 20 हजार लिटर केमिकल असा एकूण 12 लाख 79 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 26 ऑगस्ट रोजी रात्री वैजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विनय सोनावणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत जांबरगाव शिवारातील मासूक शेख यांच्या शेतगट क्रमांक 23 मध्ये चोरीचे लोखंडी स्टील आणि डांबराचे केमिकल साठवून ठेवल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी शेत परिसरात विविध आकारांच्या व लांबीच्या लोखंडी सळ्या मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याचे आढळले. तसेच केमिकलने भरलेले बॅरल आणि मोठ्या लोखंडी टँकमध्ये साठवून ठेवलेले केमिकलही पोलिसांना आढळून आले.
असा आहे जप्त केलेला मुद्देमाल
13 टन लोखंडी स्टील – किंमत 6 लाख 50 हजार रुपये
बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध आकारांच्या लोखंडी सळ्या.
केमिकलचे बॅरल – किंमत 1 लाख 29 हजार 500 रुपये
25 भरलेल्या बॅरलमध्ये सुमारे 5 हजार लिटर केमिकल, तसेच 9 रिकामे बॅरल.
लोखंडी टँक व केमिकल – किंमत 5 लाख रुपये
लोखंडी टँकमध्ये सुमारे 20 हजार लिटर केमिकल व स्वतंत्र लोखंडी टँक असा मुद्देमाल.
अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 12 लाख 79 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या केमिकलचे प्रमाण सुमारे 20 हजार लिटर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी भूषण पाटील (रा. पारोळा), अजय पाटील (रा. नाशिक) आणि शेतमालक सय्यद मासूक सय्यद नूर यांच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 558/2026 कलम 317(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोखंडी स्टील आणि केमिकल ग्रामीण भागातील शेत परिसरात लपवून का ठेवण्यात आले होते, हा मुद्देमाल नेमका कोठून आणण्यात आला, तो कोणाच्या सांगण्यावरून साठवण्यात आला तसेच चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा अनधिकृत साठवणुकीसाठी अशा आडोशाच्या ठिकाणांचा वापर केला जात होता का, याचा तपास वैजापूर पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भगवत फुंदे, वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत विनय सोनावणे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे वैजापूर, तसेच पोह/पं. युवराज पाडळे, पोलीस अंमलदार घोरे झांटे, किसान गवळी, विशाल पडळकर, अधिनाथ भासकर, गणेश गोरेख, उद्धव कांबळे, प्रशांत गिते, प्रल्हाद जटाळे, अजित नाचन, अरवाज चौधरी, ज्ञानेश्वर पाडळे आणि होमगार्ड यांनी सहभाग घेतला.
What's Your Reaction?