जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते दिल्ली मोर्चासाठी रवाना, रामलीला मैदानावर जनसागर लोटणार...!
जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते दिल्ली मोर्चासाठी रवाना...
‘बदलाव जरूरी है’ रॅलीसाठी 1 सप्टेंबरला रामलीला मैदानावर शक्तिप्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29 (डि-24 न्यूज) : भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तसेच विविध जनहिताच्या मागण्यांसाठी 1 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर ‘बदलाव जरूरी है’ या विराट रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीसाठी ‘दिल्ली चलो’चा नारा देण्यात आला असून, देशभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक दिल्लीकडे रवाना होत आहेत.
‘For The People, For The Future’ अर्थात ‘जनतेसाठी, भविष्यासाठी’ या घोषवाक्याखाली ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, सार्वजनिक आरोग्य व शिक्षण, महिला आरक्षण, शेतकऱ्यांना हमीभाव तसेच कामगारांच्या हक्कांसह विविध प्रश्न या रॅलीच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत.
आठ प्रमुख मागण्यांवर भर
भाकपने या रॅलीच्या माध्यमातून आठ प्रमुख मागण्या पुढे केल्या आहेत. त्यामध्ये वाढत्या महागाईवर नियंत्रण आणणे, युवकांना रोजगाराची हमी देणे, सर्वांसाठी मोफत व सार्वत्रिक आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देणे, संसद व विधानसभांमध्ये महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करणे, शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (MSP) कायदेशीर हमी देणे, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणे, ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी तसेच दलित-आदिवासींवरील अत्याचार व विस्थापन थांबवून त्यांना न्याय देणे, या मागण्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातूनही मोठा सहभाग
या रॅलीत सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरासह सिल्लोड, गंगापूर आणि फुलंब्री तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत. देशभरातून लाखो कार्यकर्ते व समर्थक रॅलीत सहभागी होण्याची अपेक्षा भाकपकडून व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती भाकप तथा AIDRM चे केंद्रीय सदस्य कॉ. मधुकर खिल्लारे यांनी दिली.
What's Your Reaction?