सणासुदीच्या काळात हाॅकर्सवर अन्याय होऊ देणार नाही, गुन्हे दाखल झाले तरी चालतील - नासेर सिद्दीकी
हॉकर्सवर अन्याय होऊ देणार नाही; गुन्हे दाखल झाले तरी चालतील : नासेर सिद्दीकी
सणासुदीच्या काळात कारवाई केल्यास एमआयएमचा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 16 (डि-24 न्यूज) : सणासुदीचे दिवस सुरू असून शहरातील हॉकर्स आपल्या हातगाड्या लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई झाल्यास एमआयएम शांत बसणार नाही. हॉकर्सच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, असा इशारा एमआयएमचे शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी हॉकर्सवर कारवाई करताना कोणी फोन करून हस्तक्षेप करू नये, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिल्याचा दावा सिद्दीकी यांनी केला. या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शहरातील हॉकर्ससाठी महापालिकेने अद्याप निश्चित हॉकर्स झोन उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या गरीब हॉकर्सनी व्यवसाय करायचा तरी कुठे, असा सवाल सिद्दीकी यांनी उपस्थित केला.
महापालिकेने प्रथम हॉकर्ससाठी जागा निश्चित करून द्यावी. त्यानंतरही संबंधित हॉकर्स रस्त्यावर व्यवसाय करत असतील, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी. अशा कारवाईला कोणीही विरोध करणार नाही. मात्र, जागा उपलब्ध करून न देता केवळ कारवाई केली जात असेल तर एमआयएम हॉकर्सच्या न्याय्य हक्कांसाठी विरोध करेल, असे सिद्दीकी यांनी स्पष्ट केले.
शहरात अनेक नागरी प्रश्न प्रलंबित आहेत. महापालिका प्रशासनाने विकासकामे आणि नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. विकासाच्या आड एमआयएम येणार नाही; मात्र सणासुदीच्या काळात हॉकर्सना त्रास दिल्यास ते सहन केले जाणार नाही, अशी भूमिका सिद्दीकी यांनी मांडली.
हॉकर्सना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविणे आणि त्यानंतर शहरातील वाहतूक व अतिक्रमणाच्या प्रश्नांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी एमआयएमचे शहर सरचिटणीस फेरोज पठाण, शहर उपाध्यक्ष सिराज पटेल आणि उपाध्यक्ष जब्बार खान उपस्थित होते.
What's Your Reaction?