देवगिरी बँकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा...!
देवगिरी बँकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा...
छत्रपती संभाजीनगर, दि.21(डि-24 न्यूज)- “करो योग, रहो निरोग” या संदेशाला अनुसरून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देवगिरी बँकेच्या वतीने विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास बिहार राज्यातील पश्चिम चंपारण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. संजीव जैस्वाल तसेच डॉ. सौ. मंजु चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चारुदत्त देशपांडे उपस्थित होते. यावेळी देवगिरी बँकेचे अध्यक्ष श्री. किशोर शितोळे, नगरसेवक श्री. रामेश्वर भादवे, श्री. विजय जैस्वाल, श्री. मुकुंद लाडकीकर, संचालक श्री. सुरेश जगाडे, संचालिका सौ. क्षमाताई खोब्रागडे, संचालिका सौ. प्रज्ञाताई तल्हार, संचालिका सौ. अमिताताई लेकुरवाळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीण नांदेडकर उपस्थित होते. बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमादरम्यान आरोग्य, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली यासंदर्भात उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना खासदार डॉ. संजीव जैस्वाल आणि डॉ. सौ. मंजु चौधरी यांनी सविस्तर उत्तरे दिली. योगाचे मानवी आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम, शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी त्याचे महत्त्व तसेच नियमित योगाभ्यासाचे फायदे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी देवगिरी बँकेचे अध्यक्ष श्री. किशोर शितोळे यांनी योग हा निरोगी आणि संतुलित जीवनाचा आधार असून प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करून आरोग्य संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे
पोहोचला.
What's Your Reaction?