झाल्टा फाट्यावर 12.27 लाखांचा गुटखा जप्त, एका आरोपीवर गुन्हा दाखल...!
झाल्टा फाट्यावर 12.27 लाखांचा गुटखा जप्त,
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- राज्यात अवैधरीत्या भेसळ करणारे आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाईचा बडगा उगारला असून, शहरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. चिकलठाणा परिसरातील झाल्टा फाटा येथे अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकत तब्बल ₹12 लाख 27 हजार 964 किमतीचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अवैध अन्नपदार्थ व भेसळ करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की, MH-20 GZ-2247 क्रमांकाच्या वाहनातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने चिकलठाणा येथील झाल्टा फाटा परिसरात सापळा रचून वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा साठा आढळून आला. कारवाईत एकूण ₹12,27,964 किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.
या प्रकरणात राजेंद्र बाविस्कर व इतर आरोपींविरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त करकळे यांनी दिली.
What's Your Reaction?