जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊटचा धडाका, 77 आरोपींवर 73 गुन्हे दाखल, 2.32 कोटींचा मुद्देमाल जप्त...!
जिल्ह्यात"ऑपरेशन ऑल आऊटचा धडाका...! 77 आरोपींवर 73 गुन्हे; 2.32 कोटींचा मुद्देमाल जप्त, 2 गावठी कट्टे हस्तगत"
एकाच रात्री पोलिसांची मोठी कारवाई; अवैध वाळू तस्करी, दारू, गुटखा, जुगार आणि शस्त्रधारकांवर धडक मोहिम...
छात्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- जिल्ह्यातील अवैध धंदेविरोधात पोलीस प्रशासनाने "ऑपरेशन ऑल आऊट" अंतर्गत मोठी कारवाई करत असामाजिक घटकांना मोठा धक्का दिला आहे. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार 20 जून रोजी सायंकाळी 6 ते 21 जून पहाटे 6 या कालावधीत जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत एकूण 77 आरोपींविरोधात 73 गुन्हे दाखल करून तब्बल 2 कोटी 32 लाख 4 हजार 723 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या विशेष मोहिमेत अवैध वाळू तस्करीवर मोठा फटका बसला असून 8 गुन्ह्यांत 9 आरोपींवर कारवाई करण्यात आली. यावेळी 11 वाहने जप्त करण्यात आली असून जवळपास 1 कोटी 98 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
गावठी हातभट्टी दारू प्रकरणात 9 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईदरम्यान 1110 लिटर गावठी दारू व रसायनांचा साठा नष्ट करण्यात आला असून 90 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या 31 आरोपींवर कारवाई करत 685 बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय जुगार अड्ड्यांवर छापेमारी करून 20 आरोपींना ताब्यात घेत रोख रक्कम आणि 10 मोटारसायकलींसह 5 लाख 38 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष म्हणजे, शस्त्रास्त्रांविरोधातील कारवाईत 2 गावठी कट्टे आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच एका आरोपीकडून तलवारही हस्तगत करण्यात आली आहे.
प्रतिबंधित गुटखा प्रकरणात 6 गुन्हे दाखल करून 12 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवंश तस्करी आणि अवैध कत्तलीविरोधात कारवाई करत 24 जनावरे सुरक्षित गोशाळेत पाठविण्यात आली.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. आगामी काळातही नाकाबंदी, कोम्बिंग आणि "ऑल आऊट" मोहिमा आणखी तीव्र करण्यात येणार असून गुंडगिरी व अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहणार आहे.
जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा हा धडाका सुरूच राहणार की गुन्हेगार पुन्हा डोके वर काढणार...? याकडे आता सर्वांचे लक्ष
लागले आहे.
What's Your Reaction?