नाना पाटेकर यांच्या अकाली एक्झिटने चाहत्यांना धक्का, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रध्दांजली
नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वाची मोठी हानी
75व्या वर्षी काळाच्या पडद्याआड; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई, दि. 8 (डि-24 न्यूज) : भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड, दमदार आणि संवेदनशील अभिनयाची अमीट छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (दि. 8) वयाच्या 75व्या वर्षी गोव्यात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीसह संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाक्षेत्राने एक हरहुन्नरी, संवेदनशील आणि प्रभावी कलाकार गमावला असल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नाना पाटेकर हे गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी असताना पहाटे अस्वस्थ झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सुमारे 45 मिनिटे वैद्यकीय प्रयत्न केले; मात्र त्यांना वाचवता आले नाही. रुग्णालयातील माहितीनुसार त्यांचे निधन कार्डियाक अरेस्टमुळे झाले.
नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, रंगकर्मी आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवादफेकीने, तीव्र अभिनयाने आणि प्रत्येक भूमिकेला दिलेल्या वेगळ्या छटेमुळे नाना पाटेकर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, "नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या."
‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींसह अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली. त्यांच्या प्रभावी अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांसह विविध मान-सन्मान मिळाले होते. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
नाना पाटेकर आणि पवार कुटुंबातील जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख करताना सुनेत्रा पवार भावूक झाल्या. "नानांचे आदरणीय अजितदादांशी अतिशय जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि स्नेहाचे संबंध होते. कौटुंबिक सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात ते नेहमी पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी ही माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत वैयक्तिक आणि विशेष दुःखद आहे," असे त्यांनी म्हटले.
अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही नाना पाटेकर यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव कायम जपली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि वंचित घटकांसाठी त्यांनी केलेले सामाजिक कार्य विशेष उल्लेखनीय राहिले. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांसाठी काम केले. त्यामुळे एक कलाकार म्हणूनच नव्हे, तर सामाजिक संवेदनशीलता जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली.
"कलेचा आणि सामाजिक सेवेचा ध्यास घेतलेल्या या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली. नाना पाटेकर यांच्या अभिनयातील सामर्थ्य, त्यांच्या व्यक्तिरेखांची प्रभावी मांडणी आणि सामाजिक कार्याची प्रेरणा कायम स्मरणात राहील," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका प्रभावी पर्वाचा अंत झाला असून, त्यांच्या अभिनयाची आणि सामाजिक कार्याची आठवण रसिकांच्या मनात कायम राहणार आहे.
What's Your Reaction?