वर्षभर सोने खरेदी करु नका, इंधनाचा वापर जपून करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
वर्षभर सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदींची 9 आवाहनं, काहीतरी मोठं घडणार का...!
नवी दिल्ली, दि.10(डि-24 न्यूज)- भारत देशासह जगातील अनेक देश काही आव्हानांचा सामना करत आहेत. विविध देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक संकटाला तोंड देत असताना सुजाण नागरिक म्हणून आपण काही गोष्टी करायला हव्यात. पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळावी, विदेशी प्रवास टाळावा तसेच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल त्यांनी मते मांडली. यावेळी त्यांनी देशवासियांना उद्देशून त्यांनी प्रमुख 9 आवाहने केली. प्रामुख्याने सोने खरेदी टाळावी आणि पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करावा, या मोदींच्या आवाहनामुळे पुढील काळात नेमकी काय परिस्थिती ओढावणार आहे, याबद्दल लोकांच्या मनात संशयाचे धुके दाटले आहे.
नरेंद्र मोदी यांची देशवासियांना उद्देशून कोणती 9 आवाहने
पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा कारण दर खूप वाढले आहेत.
खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा.
पुढील एक वर्ष सोने खरेदी करू नका.
वर्षभर विदेशी प्रवास टाळा.
कच्चा तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे.
परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे, परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही.
जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा.
वर्क फ्रॉम होम वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या.
परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन वाचवण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी, नागरिकांना एका वर्षासाठी सोने खरेदी न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मोदींनी अशी आवाहने करण्यामागे कारण काय...?
इराणविरुद्धची लष्करी कारवाई अमेरिकेने थांबल्याचे जाहीर केले आहे. मात्र, होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव कायम आहे. अमेरिका-इराण संघर्ष अर्थात या युद्धाचा फटका जागतिक व्यापाराला आणि इंधन पुरवठ्याला बसत आहे. कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 110 ते 120 डॉलरपर्यंत पोहोचल्याने भारतात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. जागतिक अस्थिरतेमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे भारताच्या आयात-निर्यातीवर, विशेषतः खते आणि ऊर्जा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसांत भारतीय बाजारातून अंदाजे 14 हजार 231 कोटी रुपये काढून घेतले आहेत.
भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खरेदीदारांपैकी एक आहे. लग्नसमारंभांपासून ते गुंतवणुकीपर्यंत, भारतीयांचे सोन्याशी घनिष्ठ नाते आहे. परंतु जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी एक वर्षासाठी सोने खरेदी केले नाही तर त्याचा परिणाम केवळ दागिन्यांच्या बाजारपेठेपुरता मर्यादित राहणार नाही. यामुळे देशाची अर्थव्यवस्था, रुपया, व्यापार तूट आणि गुंतवणुकीच्या पद्धतींमध्येही महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात.
What's Your Reaction?