बिडकीनचे तायक्वांडो खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नेपाळमध्ये रवाना....
बिडकीनचे तायक्वांदो खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नेपाळला रवाना...
19 देशांतील खेळाडूंचा सहभाग; पाच खेळाडूंकडून भारताला पदकाची आशा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28 (डि-24 न्यूज) – बीडकीन येथील डीएमआयसी परिसरातील तायक्वांदो खेळाडू नेपाळमध्ये 30 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज दुपारी रेल्वेने रवाना झाले. आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक डॉ. हाफिज इम्रान यांच्या नेतृत्वाखाली हा संघ नेपाळला रवाना झाला आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकूण 19 देशांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई करून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या बीडकीन येथील पाच खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदक मिळविण्याचा खेळाडूंचा प्रयत्न असेल. नेपाळमध्येही हे खेळाडू सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. हाफिज इम्रान यांनी व्यक्त केला.
खेळाडूंना निरोप देत नागरिकांकडून शुभेच्छा
नेपाळ दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी बीडकीन येथील नागरिकांच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सार्थक राठोड, आर्यन राठोड, अर्श अनिस शेख, हुमायु हाफीज इम्रान आणि अर्श सुफीयान कुरेशी या पाच खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या वेळी बीडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, मौलाना नूर, मौलाना सुलेमान, मौलाना शौकत, फिरदौस पठाण, नगरसेवक महेमूद शहा, नगरसेवक अस्लम, नगरसेवक सद्दाम शेख, हाजी युनुस, शिवाजी चौहान, सचिन शिंदे, दस्तगिर गजाली, सय्यद अब्दुल गफूर, अब्दुल रऊफ, नदीम मिर्झा, समीर मसूद शेख आदी उपस्थित होते.
बीडकीनच्या या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करून भारतासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नाव उंचवावे, अशा शुभेच्छा यावेळी उपस्थितांनी दिल्या.
What's Your Reaction?