900 मिमी जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे महापौरांचे आदेश...

 0
900 मिमी जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे महापौरांचे आदेश...

900 मिमी जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश...

वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी एमएसईबीशी समन्वय साधण्याच्या महापौरांच्या सूचना...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- शहरातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेली 900 मिलिमीटरची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावी तसेच पाणी येण्याच्या वेळेत वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी महावितरण (एमएसईबी) प्रशासनाशी समन्वय साधावा, असे निर्देश आज महापौर श्री समीर राजूरकर यांनी दिले.

आज सकाळी साडेनऊ वाजता महापौरांच्या अध्यक्षतेखाली शहरातील पाणी वितरण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर श्री राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती श्री अनिल मकरिये तसेच आयुक्त श्री अमोल येडगे उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेली 900 मिमी जलवाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यावर विशेष भर दिला. सद्यस्थितीत शहराला मिळणाऱ्या 155 एमएलडी पाणीपुरवठ्यात या जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू केल्यावर किमान 17 एमएलडीची वाढ होणार असून त्यामुळे शहरातील पाण्याच्या तुटवड्यात मोठ्या प्रमाणात घट होण्यास मदत होणार आहे.

तसेच महापालिकेच्या पाणी वितरण विभागातील अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील प्रत्येक झोननिहाय पाणी वितरण व्यवस्थेचा स्वतंत्र चार्ट तयार करून सादर करावा, प्रत्येक उप अभियंता यांनी लाईनमन वर नियंत्रण ठेवावे असेही निर्देश देण्यात आले.

तांत्रिक कारणांमुळे अथवा पाइपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास तो पूर्ववत होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे, याची अचूक माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना वेळेत द्यावी, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

ज्या भागांमध्ये फीडर लाईनमधून थेट नळ कनेक्शन घेण्यात आले आहे, त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी क्रॉस कनेक्शन करून सर्व भागांना समान आणि नियमित पाणीपुरवठा मिळेल, यासाठी योग्य नियोजन करावे. याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील आठवड्यात सादर करण्याचे निर्देश माननीय पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow