अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई, वाळूज येथे मिठाई अस्थापनेचा परवाना निलंबित, 7 लाखांचा अन्नसाठा जप्त

 0
अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई, वाळूज येथे मिठाई अस्थापनेचा परवाना निलंबित, 7 लाखांचा अन्नसाठा जप्त

छत्रपती संभाजीनगर विभागात अन्न व औषध प्रशासनाची सहा आस्थापनांवर कारवाई

7 लाख 9 हजार रुपयांचा अन्नसाठा जप्त ; 3 हजार 622 किलो अन्नपदार्थ व 7 हजार 104 शीतपेयांच्या बाटल्यांचा समावेश...

वाळूज येथील मिठाई विक्री आस्थापनेचा परवाना निलंबित...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27 (डि-24 न्यूज) :- अन्न व औषध प्रशासनाने 25 व 26 ऑक्टोबर 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर विभागातील सहा अन्न आस्थापनांवर कारवाई करून 7 लाख 9 हजार 394 रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त केला. यामध्ये 3 हजार 622.1 किलो अन्नपदार्थ व 7 हजार 104 शीतपेयांच्या बाटल्यांचा समावेश आहे. कमी दर्जाचे व भेसळयुक्त अन्नपदार्थ असल्याचा संशय, अस्वच्छ वातावरणात उत्पादन व पॅकिंग तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड व लातूर जिल्ह्यांतील आस्थापनांची तपासणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज (बजाज नगर) येथील मे. बिकानेर मिठाईवाला या आस्थापनेत अस्वच्छ वातावरणात मिठाईचे पॅकिंग होत असल्याचे आढळले. तसेच खव्याऐवजी स्वीट बर्फीचा वापर केल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणचा 18 हजार 950 रुपये किमतीचा 56.5 किलो अन्नसाठा नष्ट करण्यात आला असून, आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड येथील मे. सह्याद्री फूड्स या आस्थापनेतून 2 लाख 64 हजार 700 रुपये किमतीचा 1 हजार 153 किलो शेव, लसूण चिवडा, नमकीन व स्पेशल फरसाणाचा साठा जप्त करण्यात आला. कमी दर्जाच्या अन्नपदार्थांचा संशय व अस्वच्छ वातावरणात पॅकिंग होत असल्याने ही कारवाई करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील दोन आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

एमआयडीसी परिसरातील मे. पेबल नमकीन या आस्थापनेतून भेसळ व मिथ्याछापाचा (चुकीच्या लेबलिंगचा) संशय आणि परिशिष्ट 4 च्या उल्लंघनाप्रकरणी 1 लाख 24 हजार 540 रुपये किमतीचा 1 हजार 392 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. तसेच झुम झुम कॉलनी येथील मे. झुम झुम इंडस्ट्रीज या आस्थापनेतून कमी दर्जा व मिथ्याछापाच्या संशयावरून 1 लाख 8 हजार 244 रुपये किमतीचा 123 किलो अन्नसाठा व 7 हजार 104 शीतपेयांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

नांदेड एमआयडीसी येथील मे. वरदविनायक एंटरप्रायझेस या आस्थापनेतून भेसळ व मिथ्याछापाचा संशय तसेच परिशिष्ट 4 चे उल्लंघन केल्याप्रकरणी 1 लाख 33 हजार 200 रुपये किमतीचा 399.6 किलो सोया चंक्सचा साठा जप्त करण्यात आला.

लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील मे. कोर्डे फूड्स या आस्थापनेतून 59 हजार 760 रुपये किमतीचा 498 किलो शेवचा साठा जप्त करण्यात आला असून, या अन्नपदार्थात कृत्रिम रंग वापरल्याचा संशय आहे.

अन्न व्यवसाय चालकांनी अन्नपदार्थांची विक्री योग्य लेबलसह पॅकबंद स्वरूपातच करावी, तसेच उत्पादन व साठवणूक स्वच्छ वातावरणात करावी. वैध परवाना किंवा नोंदणी असावी आणि साठ्याच्या प्राप्ती व विल्हेवाटीचे संपूर्ण अभिलेख जतन करावेत. तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 आणि संबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे. कमी दर्जाचे, असुरक्षित किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांना आवाहन

नागरिकांनी परवानाधारक अथवा नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत आणि सुटे व विनालेबल अन्नपदार्थ खरेदी करणे टाळावे. खरेदीपूर्वी उत्पादनाचे लेबल, बॅच क्रमांक, पॅकिंग दिनांक व वापराची अंतिम मुदत तपासावी. कमी दर्जाचे, कालबाह्य किंवा संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा https://complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे

आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow