उद्या शहरात निघणार जुलूस-ए-मोहंमदी, तयारी पूर्ण
ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी होणार; जुलूस-ए-मोहम्मदीची तयारी पूर्ण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - उद्या ईद-ए-मिलादुन्नबीचा पवित्र सण 26 ऑगस्ट रोजी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम बांधवांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, धार्मिक कार्यक्रम आणि जुलूसाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील जुलूस-ए-मोहम्मदी समितीच्या वतीने 26 ऑगस्ट रोजी हजरत निजामुद्दीन चोक येथून जुलूस काढण्यात येणार आहे. जुलूसापूर्वी पोलिसांच्या उपस्थितीत तसेच आयोजक आणि मान्यवरांच्या सहभागाने विविध नियोजन करण्यात येणार आहे.
हजरत निजामुद्दीन चौक येथून सुरू होणारा जुलूस शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. या मार्गावर निजामुद्दीन चौक, चेलीपूरा, शहाबाजार, नवाबपुरा, मंजूरपुरा, लोटा कारंजा, जुना बाजार, चमन, सिटीचौक, सराफा आदी परिसरांचा समावेश आहे. जुलूसाच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांकडून स्वागत करण्यात येणार आहे.
गेल्या सुमारे 35 वर्षांपासून जुलूस-ए-मोहम्मदीचे आयोजन पारंपरिक पद्धतीने करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. यंदाही मोठ्या उत्साहात जुलूस काढण्यात येणार असून, विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांचा सहभाग राहणार आहे.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी हिरवे झेंडे आणि पताका लावण्यात आल्या आहेत. नागरिकांमध्येही सणाबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे. जुलूसाच्या निमित्ताने नागरिकांसाठी पाणी, भोजनदान आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात येत आहे.
पोलिस प्रशासनाकडूनही नियोजन...
जुलूस शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी आयोजक समितीने पोलिस प्रशासनाची भेट घेऊन जुलूसाच्या मार्गाची तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची माहिती दिली. पोलिसांकडूनही आवश्यक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत आहे.
जुलूसामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता असून, सर्वांनी शांतता व सुव्यवस्था राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने शहरात बंधुभाव, शांतता आणि एकतेचा संदेश देत हा उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत.
What's Your Reaction?