महापालिका शाळांसाठी "झिरो बजेट 10 पाॅईंट अजेंडा, नगरसेवक हर्षवर्धन कराड यांचा सर्वसाधारण सभेत प्रस्ताव...!
महापालिका शाळांसाठी ‘झिरो बजेट 10 पॉइंट अजेंडा’; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
हर्षवर्धन भागवत कराड यांचा सर्वसाधारण सभेत प्रस्ताव; शिक्षणासोबत कौशल्य विकासावर भर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते शिक्षण न देता त्यांना जीवनासाठी आवश्यक कौशल्ये, संधी आणि आत्मविश्वास मिळावा, यासाठी ‘झिरो बजेट 10 पॉइंट अजेंडा’ राबविण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला.
स्वीकृत नगरसेवक हर्षवर्धन भागवत कराड यांनी हा प्रस्ताव मांडला. या उपक्रमांतर्गत सेल्फ-डिफेन्स ट्रेनिंग, रीडिंग रिलेशनशिप, स्कूल कॉलेज एक्सचेंज, कम्युनिटी क्लासरूम, करिअर एक्सपोजर, सेफ अँड इन्फॉर्म्ड चाइल्डहुड, स्टुडंट्स हेल्थ अवेअरनेस, स्कॉलरशिप गाईडन्स प्रोग्राम, क्लीन स्कूल-ग्रीन स्कूल आणि पॅरेंट गाईडन्स प्रोग्राम अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांच्या भवितव्याची जबाबदारी अधोरेखित करताना कराड यांनी सभागृहात सांगितले की, महापालिकेच्या 50 शाळांमध्ये जवळपास 18 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही केवळ विद्यार्थ्यांची संख्या नसून 18 हजार स्वप्ने, 18 हजार कुटुंबांच्या अपेक्षा आणि शहराच्या भविष्यातील 18 हजार बीज आहेत. या विद्यार्थ्यांचे पालन-पोषण आणि योग्य दिशेने घडविणे ही सभागृहाची जबाबदारी आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये 17 माध्यमिक शाळांचा समावेश असून, इयत्ता 7 वी ते 10 वीमध्ये सुमारे 3 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची ही मोठी संख्या लक्षात घेता शालेय शिक्षणासोबत आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्यविषयक जागरूकता, करिअरच्या संधी, आर्थिक साक्षरता आणि जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास करण्याची गरज असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
‘झिरो बजेट’ संकल्पनेचा उद्देश महापालिकेवर कोणत्याही अतिरिक्त खर्चाचा भार न टाकता, महापालिकेकडे आणि शहराकडे आधीपासून उपलब्ध असलेल्या संसाधनांचा एकत्रित वापर करणे हा आहे. शिक्षक, तज्ज्ञ, स्वयंसेवक, माजी विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींना या उपक्रमांशी जोडून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी सहज उपलब्ध करून देता येतील. यासाठी प्रत्येक उपक्रमासाठी नवीन निधी किंवा स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता नसून उपलब्ध संसाधने एकत्र आणणे, योग्य नियोजन करणे आणि सर्वांनी मिळून पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे कराड यांनी स्पष्ट केले.
“महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी नव्हे, तर आयुष्यासाठी तयार करणे गरजेचे आहे. बदलासाठी नेहमी मोठ्या निधीची गरज नसते. योग्य नियोजन, इच्छाशक्ती आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून मोठा बदल घडवता येतो,” अशी भूमिका हर्षवर्धन भागवत कराड यांनी मांडली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘मीही काहीतरी मोठं करू शकतो’ हा आत्मविश्वास मिळावा, तसेच महापालिका शाळांमधील शिक्षण अधिक व्यापक, व्यावहारिक आणि जीवनाशी जोडणारे व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
What's Your Reaction?