धार्मिक स्थळे व शाळेजवळील दारुची दुकाने हटवा, सर्वसाधारण सभेत एमआयएम नगरसेवकांचा गदारोळ...!
शाळा व धार्मिक स्थळांजवळील दारुच्या दुकाने हटविण्याच्या मागणीवर एमआयएमचा गदारोळ
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज )-शहरातील शाळा आणि धार्मिक स्थळांच्या शंभर मीटर परिसरातील मद्यविक्रीची दुकाने हटविण्याच्या मागणीवरून मंगळवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला. या विषयावर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवक आमनेसामने आल्याने काही काळ सभागृहाचे वातावरण तापले.
एआयएमआयएमच्या नगरसेवकांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडत शाळा व धार्मिक स्थळांजवळील मद्यविक्रीची दुकाने तातडीने हटविण्याची मागणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते समीर साजिद यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा देत न्यायालयाच्या आदेशांचाही हवाला दिला. यावेळी सर्व पक्षांनी या विषयावर सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे आणि स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिया यांनी मद्यविक्री दुकानांचे परवाने देणे व त्यांचे स्थान निश्चित करणे हा महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रातील विषय नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या विषयावर मनपाच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
वाद वाढत असताना महापौर समीर राजूरकर यांनी हस्तक्षेप करत नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन मनपा आयुक्तांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याची शिफारस करावी, असे निर्देश दिले. त्यानंतर सभागृहातील वातावरण निवळले.
महापौरांनी स्पष्ट केले की, मद्यविक्री परवान्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे असला तरी जनभावनांचा आदर राखून संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येईल. त्यानंतर हा विषय शांत झाला.
What's Your Reaction?