राम मंदिर चढावा चोरी प्रकरणी, दुष्काळ व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हर्षवर्धन सपकाळ यांची टिका...!

 0
राम मंदिर चढावा चोरी प्रकरणी, दुष्काळ व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हर्षवर्धन सपकाळ यांची टिका...!

राम मंदिर ट्रस्ट चढावा चोरी, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांवर सपकाळ यांची टीका...

पत्रकार परिषदेत संघ व भाजपावर हल्लाबोल 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राम मंदिर ट्रस्टमधील कथित चढावा चोरी प्रकरणावर संघ व भाजपावर जोरदार टीका केली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी प्रश्न आणि महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. मराठवाड्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर भूमिका मांडली.

याप्रसंगी खासदार डॉ कल्याण काळे, प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, प्रवक्ते हनुमंत पवार, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम, माजी आमदार एम.एम.शेख, जेष्ठ नेते नामदेव पवार आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राम मंदिर उभारणीसाठी जमा झालेल्या देणगीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. संबंधित दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या प्रकरणात स्पष्ट भूमिका घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना त्यांनी सरकारवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. दुष्काळाची शक्यता आधीच स्पष्ट असतानाही कोणतीही प्रभावी पूर्वतयारी करण्यात आली नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच कर्जमाफीच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली.

महायुती सरकारवर टीका करताना सपकाळ म्हणाले की, सत्ताधारी पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद वाढत असून हे सरकार स्थिर नसल्याचे चित्र आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शरद पवार यांच्या कथित एनडीए प्रवेशाच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावत, त्या केवळ अफवा असल्याचे सांगितले. तसेच मुंबईतील विकासकामे आणि विविध स्मारकांच्या कामांबाबतही सरकारवर त्यांनी टीका केली.

राहुल गांधी यांच्या भूमिकेचे समर्थन करताना सपकाळ म्हणाले की, बेरोजगारी, नीट परीक्षा, यूपीएससी आणि इतर भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात काँग्रेस सातत्याने आवाज उठवत आहे. 2029 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात राजकीय परिवर्तन घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळ, शेतकरी, राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार तसेच महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow