हज हाऊसमध्ये वक्फ मंडळाचे कार्यालय स्थलांतरित करण्यास काँग्रेसचाही विरोध...!

 0
हज हाऊसमध्ये वक्फ मंडळाचे कार्यालय स्थलांतरित करण्यास काँग्रेसचाही विरोध...!

हज हाऊसमध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यालय स्थलांतरित करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करून हज हाऊसची जागा हज कार्यासाठी राखीव ठेवण्याबाबत निवेदन, मागणी मान्य न केल्यास लोकशाही मार्गाने जोरदार आंदोलन....

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)- हज हाऊसमध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. सदर निर्णयाबाबत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चिंता व्यक्त करण्यात येत असून शासन स्तरावर याचा पुनर्विचार व्हावा, यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे हे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आले. 

हज हाऊस ही वास्तू प्रामुख्याने हज यात्रेकरूंना सेवा, मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच हजसंबंधित प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे. दरवर्षी हजारो हज यात्रेकरू विविध कामांसाठी हज हाऊसला भेट देतात. आगामी हज प्रक्रियेच्या कालावधीत यात्रेकरू, प्रशिक्षक व संबंधित नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार आहे. अशा परिस्थितीत हज हाऊसची जागा इतर कार्यालयीन वापरासाठी देणे हे त्याच्या मूळ उद्देशावर परिणाम करणारे ठरू शकते. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे राज्यभरात विविध पर्यायी जागांचा विचार करता येऊ शकतो. त्यामुळे हज यात्रेकरूंसाठी समर्पित असलेल्या हज हाऊसची निवड करण्याऐवजी अन्य पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

यापूर्वीही काही कार्यालयांना हज हाऊसमध्ये तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र तात्पुरत्या व्यवस्थेच्या नावाखाली कायमस्वरूपी स्वरूप निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत स्पष्ट धोरण व कालमर्यादा निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच हज हाऊसच्या वापराबाबत निर्णय घेण्यापूर्वी अल्पसंख्याक संस्था, विविध सामाजिक संघटना, हज प्रशिक्षक, हज यात्रेकरू प्रतिनिधी व संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेणे आवश्यक आहे.

हज हाऊस ही केवळ एक इमारत नसून महाराष्ट्रातील लाखो मुस्लिम नागरिकांच्या भावना, धार्मिक गरजा व हज व्यवस्थापनाशी जोडलेली महत्त्वपूर्ण संस्था आहे. त्यामुळे तिच्या मूळ उद्देशावर परिणाम करणारा कोणताही निर्णय व्यापक विचारविनिमय करूनच घेण्यात यावा. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम म्हणाले की मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल.

यावेळी शहराध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, जेष्ठ नेते इब्राहिम पठाण, युवक प्रदेश उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम, इंजि. विशाल बन्सवाल, मोईन कुरेशी, आबेद हुसेन, शफीक शहा, मोहम्मद जाकेर, शेख कैसर बाबा, नदीम सौदागर, योगेश थोरात, साहेबराव बनकर, चंद्रकांत बनसोडे, मुनीर पटेल, प्रकाश पाटील, पुंडलिक चव्हाण, उत्तम दनके, इरफान पठाण, रामभाऊ लोखंडे आदी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थि

त होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow