मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय शिष्टमंडळाचे विभागीय आयुक्तांना निवेदन

 0
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय शिष्टमंडळाचे विभागीय आयुक्तांना निवेदन

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय शिष्टमंडळाचे विभागीय आयुक्तांना निवेदन...

डॉ. राजेंद्र दाते पाटील यांच्या अन्नत्याग आंदोलनाची तातडीने दखल घेण्याची मागणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18 (डि-24 न्यूज) : मराठा समाजाला कायदेशीर, घटनात्मक आणि शाश्वत आरक्षण मिळावे, तसेच मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आज सर्वपक्षीय व सर्वधर्मीय शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी यापूर्वी अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे करण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही या प्रश्नावर ठोस तोडगा निघालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी 9 ऑगस्ट 2026 पासून अन्नत्याग आंदोलन सुरू सुरू आहे त्यांची तब्येत खालावत चालली आहे. शासनाने त्यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

मराठा-कुणबी नोंद नसलेल्या किंवा वंशावळ जुळत नसलेल्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच ईएसबीसी आरक्षणाप्रमाणे मराठा समाजाला शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती, वसतिगृह, आर्थिक योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, महामंडळांच्या योजना यांसह इतर शासकीय सवलती लागू कराव्यात. स्वयं व इतर विद्यापीठांमधील तांत्रिक, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या ईएसबीसी विद्यार्थ्यांना शुल्क सवलत, शिष्यवृत्ती व इतर लाभ देण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेली आंदोलकांवरील प्रकरणे मागे घेण्यासाठी सुधारित शासन आदेश तातडीने जारी करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच सारथी संस्थेला विशेष निधी मंजूर करून परदेशी शिक्षण योजनेचा विस्तार करावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ‘मराठा हुतात्मा स्तंभ स्मारक’ उभारण्यासाठी जागा व निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच विविध शासकीय विभागांमधील मराठा समाजाच्या प्रलंबित उमेदवारांना त्यांच्या अर्जाच्या दिनांकानुसार तातडीने नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या सर्व मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता करावी आणि डॉ. राजेंद्र दाते पाटील यांच्या अन्नत्याग आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय व सर्वधर्मीय शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांकडे केली.

शिष्टमंडळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड सय्यद अक्रम, समाजवादीचे अब्दुल रऊफ, ऋषीकेश कांबळे, माणिकराव शिंदे, 

दिपक निकाळजे, कैसर बाबा, अफजलखान व विविध धर्मांचे धर्मगुरु उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow