5 डिसेंबर पर्यंत शंभर टक्के वक्फ मालमत्तेची नोंदणी करावी - समीर काझी
वक्फच्या सर्व मस्जिद, दरगाह, कब्रस्तानची 5 डिसेंबर पर्यंत उम्मीद पोर्टलवर 100 टक्के नोंदणी करावी...
अध्यक्ष समीर काझी यांचे आवाहन ; गाफील राहू नका...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) राज्यातील सर्व वक्फ अंतर्गत रजिस्ट्रर्ड असलेल्या मस्जिद, दरगाह, कब्रस्तान यांची दि.5 डिसेंबर 2025 पर्यंत ‘उम्मीद पोर्टल’ वर नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी केले आहे.
उम्मीद पोर्टलवर सर्व कागदपत्रांची नोंद होणे हे अतिशय आवश्यक आणि सुरक्षित आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारचा गाफिलपणा, हयगय न करता आजच्या आज नोंदणी करून घ्यावी. कागदपत्रासंबंधी काही अडचण असल्यास त्यांनी तात्काळ वक्फ बोर्डाच्या कार्यालयाशी संपर्क करावा, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. राज्याच्या सर्व जिल्ह्यात युद्ध पातळीवर काम सुरू आहेत,असेही समीर काझी यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील वक्फ संपत्तीचे व्यवस्थापन पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करण्यासाठी उम्मीद पोर्टलवर ही नोंदणी आवश्यक आहे. राज्यातील सर्व मस्जिद, दर्गा, कब्रस्तान आणि इतर वक्फ संस्थांनी आपल्या संस्थेची आवश्यक कागदपत्रे ज्यामध्ये नोंदणी प्रमाणपत्र, मालकी हक्काचे दस्तऐवज, विश्वस्त मंडळाची माहिती इत्यादी उम्मीद पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.
या उपक्रमामुळे राज्यातील वक्फ मालमत्तेचा योग्य नोंदवही तयार होईल तसेच फसवणूक, अनधिकृत वापर आणि गैरव्यवहारांना आळा बसणार असल्याचे समीर काझी यांनी सांगितले. उम्मीद पोर्टलवर नोंदणीसाठी दि.5 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर नोंदणी करता येणार नाही. ज्यांची नोंदणी होणार नाही अशा संस्था अनाधिकृत ठरू शकतात. त्यामुळे नोंदणी आवश्यकच आहे. नोंदणीसंबंधी अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी वक्फ बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी किंवा जिल्हा वक्फ बोर्डाच्या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन अध्यक्ष समीर काझी यांनी केले आहे.
वक्फ बोर्डाचे सर्व कार्यालय
सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे राज्यातील सर्व मुख्य आणि जिल्हा कार्यालये दि.5 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहेत. सर्व कार्यालयातील नियमित कामकाजाचे डेस्क बंद करून प्रत्येक डेस्कवर 5 डिसेंबर पर्यंत केवळ उम्मीद पोर्टलवरील नोंदणीशी संबंधित कामकाज सुरू राहणार आहे. या कालावधीत सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून पूर्णवेळ सर्व कार्यालये सुरू राहणार असल्याचे काझी यांनी सांगितले.
तेरा जणांची अशासकीय समिती
नेमली ; एनजीओ यांनी सेंटर सुरू करण्यासाठी पुढे यावे - समीर काझी
राज्यातील वक्फ अंतर्गत रजिस्ट्रर्ड असलेल्या मस्जिद, दरगाह, कब्रस्तान यांची उम्मीद पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी वक्फ बोर्डाच्या वतीने 13 जणांची अशासकीय समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये
जमीयत अर्शद मदनी ग्रुपचे 2, जमीयत महेमूद मदनी ग्रुपचे 2 , मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे 2 , तबलिग जमातचे 2, काझी सेवा संघ 2 , बरेलीवाले 2 आणि वक्फ बोर्डाचे 1 नोडल अधिकारी अशा 13 सदस्यांचा समावेश असणार आहे.ही समिती नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करणार असून कागदपत्रासंबंधी अडचणी दूर करण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे. त्याच बरोबर बीड जिल्ह्यासह राज्यातील समाजसेवा संस्थानी ( NGO ) नोंदणीच्या कामाला गती देण्यासाठी स्वतः हून पुढाकार घेत उम्मिद पोर्टल सेंटर सुरू करावे. त्याठिकाणी संगणकावर काम करणाऱ्या मुलांना राज्य वक्फ बोर्ड मानधन देईल असे समीर काझी यांनी सांगितले आहे.
सुट्टीच्या दिवशीही काम करा,हयगय करू नये...
अध्यक्ष समीर काझी यांनी उमीद पोर्टलच्या कामकाज व प्रगती बाबत शुक्रवारी वक्फ बोर्ड मुख्यालय,पाणचक्की येथे सर्व अधिकाऱ्यां सोबत आढावा बैठक घेतली.नोंदणी एकदा अपलोड केल्या नंतर त्याची तात्काळ शहानिशा करावी, असे निर्देश त्यांनी दिले.एक वेळी मंडळाचे सदस्य ऍड. इफतेखार हाश्मी यांनी ही सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.या वेळी मुख्यकार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद,विशेष अधीक्षक खुसरो खान प्रभारी अधिकारी सय्यद शाकिर अली,अब्दुल सत्तार, खान मुझमिल,मोहमद मुदसीर,फिरासत हुसेन,अदनान शेख,हामना शेख,सोहेल शेख आदी अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?