सोनसाखळी हिसकावणा-या टोळीवर मोक्का, 6 आरोपींवर कारवाई...!

 0
सोनसाखळी हिसकावणा-या टोळीवर मोक्का, 6 आरोपींवर कारवाई...!

सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीवर मोक्का; 6 आरोपींवर कारवाई...

छत्रपती संभाजीनगर, दि.19(डि-24 न्यूज)- शहरातील महिलांना लक्ष्य करून सोनसाखळी व मंगळसूत्र हिसकावण्याचे गुन्हे करणाऱ्या सराईत टोळीविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहा आरोपींवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

सदर प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 232/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 309(4), 115(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 मे 2026 रोजी पहाटे 5.56 वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मॉर्निंग वॉकसाठी कालिका मंदिराजवळून कारंजा मैदानाच्या रस्त्याने जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून चाकूचा धाक दाखवला आणि गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या वेळी आरोपींच्या साथीदारांनी रेकीचे काम केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

अमोल वैजनाथ गलाटे, 

मंगेश बाळ्मिक शहाणे,

शेख अल्ताफ शेख मुबारक, 

शेख सिराजुल हक शेख अन्वर अली, 

अमन मेहबूब शेख, 

आदित्य अनिल काळे.

आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून आर्थिक फायद्यासाठी शहरातील महिलांना लक्ष्य करत सोनसाखळी व मंगळसूत्र हिसकावण्याचे अनेक गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या टोळीचा मुख्य सूत्रधार अमोल गलाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्का कायद्याच्या कलम 3(1)(ii), 3(2) आणि 3(4) अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत मोहिते, पोलिस उपायुक्त (परिमंडळ-२) रत्नाकर नवले, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक राजपूत आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (उस्मानपुरा) मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा गजानन कल्याणकर, पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद भोरे तसेच पोलीस उपनिरीक्षक दिपाली सोनवणे आणि पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महिलांना लक्ष्य करणाऱ्या साखळीचोरांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असून संघटित गुन्हेगारीला कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow