मराठा - ओबीसी साथ साथ... डॉ.राजेंद्र दाते पाटील उद्या उपोषण सोडणार...!

 0
मराठा - ओबीसी साथ साथ... डॉ.राजेंद्र दाते पाटील उद्या उपोषण सोडणार...!

मराठा-ओबीसी साथ साथ; डॉ. राजेंद्र दाते पाटील उद्या उपोषण सोडणार...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होणार बैठक...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 23 (डि-24 न्यूज) : मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर उद्या, 24 ऑगस्ट रोजी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी 4.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ते उपोषण सोडणार असल्याची माहिती डि-24 न्यूजला मिळाली आहे.

गेल्या 16 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे डॉ. दाते पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांच्या उपोषणाला विविध स्तरातून मोठा पाठिंबा मिळत असून, सरकारनेही त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोबाईलवरून डॉ. दाते पाटील यांच्याशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

मराठा समाजाच्या आरक्षणासह विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी प्रमुख मागणी डॉ. दाते पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी डॉ. दाते पाटील यांनी स्वतःला झोकून दिले असून, आरक्षणाचा प्रश्न न्यायालयातही लढत आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पादत्राणे घालणार नाही, असा संकल्पही त्यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले असताना जालना येथील ओबीसी समाजातील प्रा. सत्संग मुंडे आणि राजेश मुंडे यांनी डॉ. दाते पाटील यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. ‘ओबीसी-मराठा साथ साथ’ असा संदेश देत दोन्ही समाजांनी एकोप्याने पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

सरकारकडून मिळालेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र दाते पाटील उद्या, 24 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आपले अन्नत्याग आंदोलन सोडणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाच्या पुढील भूमिकेकडे मराठा समाजासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow