अजिंठा-वेरूळ पर्यटन विकास व आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर भर देणार - केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची संभाजीनगरला भेट; पर्यटन विकासाबाबत सकारात्मक चर्चा
अजिंठा-वेरूळ पर्यटन, आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर भर; संभाजीनगरच्या विकासाला गती देण्याचे आश्वासन
छत्रपती संभाजीनगर, दि.1(डि-24 न्यूज)- केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगरला भेट दिली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड तसेच भाजपचे प्रदेश सचिव प्रवीण घुगे उपस्थित होते. भेटीदरम्यान अजिंठा-वेरूळ जागतिक वारसा स्थळांवरील पर्यटनवाढ, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटनाच्या पायाभूत सुविधांचा विकास तसेच शहरासाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी संभाजीनगरच्या पर्यटन विकासाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करत, केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करून पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.
संभाजीनगर दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री शेखावत यांनी वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली.
भेटीच्या शेवटी भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानले. यावेळी भाजपचे सचिन गुगळे व योगेश वाणी उपस्थित होते.
What's Your Reaction?