एकतानगर घटनेतील चाकू हल्ला करणारे चार आरोपींना हर्सुल पोलिसांनी केले जेरबंद...
एकतानगर, फळांची हातगाडी लावण्याच्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला; चार आरोपी अटकेत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- हर्सूल परिसरातील एकतानगर, जटवाडा रोड येथे फळांची हातगाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना 30 सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी हर्सूल पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहमान सुलतान पठाण (वय 26, रा. सावंगी, हर्सूल) हे फळविक्रीचा व्यवसाय करतात. फळांची हातगाडी लावण्याच्या कारणावरून आरोपींनी रहमान यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याबाबत रहमान यांनी 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
या तक्रारीचा राग मनात धरून त्याच दिवशी रात्री साडेसातच्या सुमारास आरोपींनी रहमान सुलतान पठाण, वय 26, धंदा फळ विक्रेता, राहणार सावंगी, ता.जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना जटवाडा रोडवरील एकतानगर परिसरात रस्त्यात गाठून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी घनश्याम ऊर्फ गणू याने चाकूने वार केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या हल्ल्यात रहमान यांच्या डाव्या हाताच्या दंडावर चाकूचा वार झाला. तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेले त्यांचे भाऊ फैसल पठाण यांच्या बरगडीवरही चाकूने वार करण्यात आल्याने ते जखमी झाले. दोन्ही जखमींवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 456/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109(1), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील योगेश ऊर्फ भावड्या (वय 21), घनश्याम ऊर्फ गणू (वय 22), उस्मान ऊर्फ शब्द हमीद खान (वय 21) आणि चेतन किशोर चौधरी (वय 20) या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींपैकी दोघांविरुद्ध यापूर्वीही शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असून त्यांच्यावर BNSS कलम 129 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास हर्सूल पोलीस करीत आहेत.
What's Your Reaction?